जळगाव : कोरोनामुळे चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, अनेक नागरिक शासन व प्रशासनाचे आदेश मानत लॉकडाऊन पाळत आहेत. मात्र, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरीभागासह ग्रामीण भागात तब्बल ६ ते ७ तास वीजपुरवठा खंडीत राहत असल्याने नागरिकांना जबरदस्त उकाड्यामुळे घरात थांबणे देखील कठीण झाले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणने आता अघोषित भारनियमनच जाहीर केल्याचे चित्र दिसून येत आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. त्यातच जिल्ह्यात तापमानाचा पारा दररोज नवनवीन विक्रमी पल्ले गाठत असताना, दुसरीक डे महावितरणकडून दररोज वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे आधीच तापमानाचा कहर सहन करण्यापलीकडे त्यातच वीजपुरवठा खंडीत होत असल्याने घरात थांबणेही कठीण झाले आहे.महावितरणने मान्सूनपुर्व कामांना सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात मुख्य वीजतारांजवळील वृक्षांच्या फांदा तोडणे, वीजेचे खराब झालेले खांब नव्याने लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे महावितरणे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. मात्र, प्रत्यक्षात वीज पुरवठा ५ तास न जाता ६ ते ७ तास खंडीत ठेवला जात आहे.विशेष म्हणजे ज्या भागात दुरुस्तीचे काम झाले आहे. त्या भागात देखील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.-दरम्यान, महावितरणतर्फे देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी विज पुरवठा खंडित होण्याचे कारण सांगण्यात येत असले तरी हा पुरवठा दिलेल्या वेळेत सुरु न होता, दोन ते तीन तास उशिराने सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.एका गावाच्या कामाला आठ दिवसमहावितरणकडून दरवर्षी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येत असतात. मात्र, या कामांची गती अतिशय संथ असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर्षाची परिस्थिती इतर वर्षांच्या तुलनेत जरा वेगळी आहे. कारण लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरातच थांबून आहेत. तसेच इलेक्ट्रिकची दुकाने बंद असल्याने कुलर देखील नागरिक खरेदी करू शकलेले नाहीत. प्रचंड तापमानामुळे घरातील पंखे देखील गरम हवा सोडत आहेत. अशा परिस्थिती वीज पुरवठा सात ते आठ तास खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील आव्हाणे, वडली, वावडदा, वडनगरी, फुफनगरी, खेडी, कानळदा या भागात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:59 PM