जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. ८ - गुरुवारी पहाटे चारची वेळ...हास्पिटलमधल्या सिस्टर्सची धावपळ... प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला ओटी मध्ये घेतले जाते...पहाटे चार वाजून ५० मिनिटांनी नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐंकून सगळ्यांच चेह-यावर हसू फुलते. काय झालयं..मुलगा की मुलगी...? डॉक्टर सांगतात....मुलगी...! टाळ्या वाजवून स्त्री जन्माचे स्वागत केले जाते. महिला दिनी तिरपोळे ता. चाळीसगाव हे माहेर तर पारोळा तालुक्यातील शिवनी हे सासर असणा-या अश्विनी आबा पाटील यांनी कन्या रत्नाला जन्म देऊन ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ असा खणखणीत संदेशच दिला आहे.अश्विनी यांची ही पहिलीच प्रसुति असून ती नॉर्मल झाली. २ किलो ४९ किलो ग्रम वजनाच्या कन्येला त्यांनी महिला दिनी जन्म दिला. त्यांचे पती एरंडोल तालुक्यात आश्रम शाळेत तर वडील संभाजी ताराचंद पाटील हे एस.टी. चालक आहेत. स्त्री रोग व प्रसृतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. विनोद कोतकर यांनी ही पसूती सुखरुप पार पाडली. पाटील कुटूंबाने ‘नकोशी’ चे स्वागत ‘हवीशी’ म्हणून पेढे वाटून केले. महिला दिनी मला पहिले अपत्य ‘मुलगी’ झाल्याचा आनंद अधिक असला तरी माझ्या छकुलीला शिकवून स्वालंबी बनविण्याचा संकल्प केलायं.' अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अश्विनी यांचे डोळे भरुन आले होते.
चाळीसगाव महिला दिनी ‘स्त्री’ जन्माचे स्वागत...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:30 PM