जळगाव/अमळनेर, दि.28- मराठी नववर्षाचे जळगाव व अमळनेर शहरात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त प्रमुख चौकांमध्ये रांगोळ्या तसेच शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी घरोघरी गुढय़ा उभारण्यात आल्या. जळगाव शहरातील ग्राम दैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे जुने जळगावात गावगुढी उभारण्यात आली.
जळगावात शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
हिंदू नववर्षानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तगणांतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत विद्यार्थीनींचे लेझीम पथक, कलशधारी महिला, भजनी मंडळ सहभागी झाले. शोभायात्रेत भक्तगणांतर्फे प्रभू रामचंद्र व शबरीमाता भेट, पंढरपूरचे विठोबा रुख्मिणी, संत गजानन महाराज, साई बाबा यांचा सजीव आरास सादर करण्यात आला. त्या पाठोपाठ कन्या भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा निमरूलन, पाणी बचत या विषयांची जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी झाले होते.
अमळनेरमध्ये आकर्षक शोभायात्रा
अमळनेरच्या ओम नारायण इंडस्ट्रिजच्या (प्रताप मील) आवारातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या अग्रभागी हातगाडीवर मोठी गुढी होती. त्यापाठोपाठ घोडेस्वार,उंटस्वार होते. त्याच्या मागे गायत्री परिवाराची पालखी होती. स्वामी नारायण परिवार,संत सखाराम महाराज वारकरी मंडळ, आदी शोभायात्रेत सहभागी झाले होते. भगवेध्वज, ढोल ताशांवर थिरकणारी तरुणाई स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण होती. भारत मातेच्या जयघोषाने शहर दणाणले होते.