लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील राजपथावर झालेल्या संचलनात ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणाऱ्या मूळजी जेठा महाविद्यालयाची एनसीसी युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हिचे शनिवारी जळगावकरांनी खुल्या जीपमध्ये रॅली काढून ढोल-ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत केले.
समृद्धी शनिवारी सकाळी दिल्लीहून जळगावात परतली. त्यावेळी जळगावरांनी तिचा ढोल-ताशांच्या तसेच फुलांच्या वर्षावात स्वागत केले. सर्वात आधी तिने डॉ.बाबासाहेब आंबडकर यांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले.
‘भारत माता की जय’चा घोष
रेल्वे स्टेशन परिसरातील खुल्या जीपमध्ये समृद्धीची रॅलीची सुरुवात झाली. हातात तिरंगा गर्वाने फडकवत असलेल्या समृद्धीसोबत तिचे वडील हर्षल संत, आई अर्चना संत, आजोबा चंद्रकांत संत, आजी प्रेरणा संत व लहान भाऊ सार्थक संत सोबत होते. नंतर ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीते, भारत माता की जय अश्या विविध देशभक्तीपर घोषणा देत नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, आस्वाद चौक, मूळजी जेठा महाविद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.
चौकाचौकात स्वागत
चौकाचौकात समृध्दी हिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात होते़ नेहरू चौक मित्र मंडळातर्फे रिकेश गांधी, पीयूष गांधी, आचार्य कॉम्प्लेक्सजवळ डॉ. संजीव हुजूरबाजार व डॉ. आरती हुजूरबाजार, शिवतीर्थ मैदान येथे महापौरांनी तिचे स्वागत केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिने मानवंदना दिली. स्वातंत्र चौक येथे ब्राह्मण सभेतर्फे किरण कुळकर्णी, संदीप कुळकर्णी, अमोल जोशी, संजय जोशी यांनी तर आकाशवाणी चौक येथे बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे श्रीकांत खटोड, राजेश नाईक, अशोक वाघ, सुधा खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्र मिश्रा, अजित नांदेडकर, अमला पाठक यांनी काव्यरत्नावली चौक येथे पिंकेथॉन ग्रुपतर्फे प्रेमलता सिंग, सरिता खाचणे, प्रकाश सिंग, क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे मधुकर पाटील, सुनील याज्ञीक, मिलिंद पुराणिक यांनी स्वागत केले. मू.जे. महाविद्यालय येथे युवाशक्ती फाउंडेशनतर्फे भव्य पुष्पवृष्टी व आतषबाजी करून रॅलीची सांगता करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
रॅलीच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, राजेश नाईक, गिरीश कुळकर्णी, पीयुष हसवाल, प्रितम शिंदे, संदीप याज्ञीक, श्याम कासार, गोपाल पंडित, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, किरण कुळकर्णी, जितेंद्र याज्ञीक, हितेष सूर्यवंशी, अर्जुन भारुळे, प्रशांत वाणी, मनोहर चव्हाण, अमोल गोपाल, राहुल चव्हाण, सौरभ कुळकर्णी, एनसीसीचे कॅडेटस यांनी परिश्रम घेतले.
शिस्त आणि संयामातूनच देशाचे नेतृत्व घडते
देशाला शिस्त प्रिय समाजाची आजच्या घडीला आवश्यकता आहे. एनसीसीमधील शिस्त आणि संयमाचे यात मोठे योगदान आहे. समृद्धी संत हिचे यश जळगावकरांना प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
मूळजी जेठा महाविद्यालयात समृध्दी संत हिचा गौरव कार्यक्रम पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी एनसीसी बटालियनचे समादेशक अधिकारी, कर्नल प्रवीण धिमन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्राचार्य प्रा.डॉ. एस.एन. भारंबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात समृध्दी हिचा मान्यवरांनी गौरव केला. याप्रसंगी डॉ. बी.एन. केसुर, सुभेदार मेजर कोमल सिंग आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांनी केले.