मुक्ताई पालखी भगवंत पांडुरंगाची भेट घेऊन सकाळी ९ वाजता मुक्ताईनगरात दाखल होणार म्हणून भाविकांनी सकाळपासून स्वागताची जय्यत तयारी केली होती. प्रतीक्षेत सर्वांच्या नजरा महामार्गावर खिळल्या होत्या. दुपारी १२ च्या सुमारास पालखी सोहळ्याचा ताफा बोदवड हायवे चौफुलीवर पोहोचला पालखी व पादुका आसनस्थ असलेल्या शिवशाही बसचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. ढोल व ताशे आणि भजनीमंडळाच्या टाळमृदंगांच्या गजरात येथूनच भाविकांनी मुक्ताई पालखीची मिरवणूक काढली. स्वागतासाठी महामंडलेशवर चैतन्य महाराज, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर, आमदार चंद्रकांत पाटील यांची पत्नी यामिनी पाटील, मुलगी संजना पाटील, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह निवृत्ती पाटील, डॉ. जगदीश पाटील, छोटू भोई, रामभाऊ पाटील ,पुरुषोत्तम वंजारी, सुधाकर सापधरे, विनोद सोनवणे व मान्यवरांनी मुक्ताई पादुकांचे दर्शन घेऊन स्वागत केले. येथून पालखी सोहळा जवळच्या मुक्ताई पादुकांवर पोहचला तद्नंतर नवे मुक्ताई मंदिर येथे मूळ स्थानी मुक्ताई गाभाऱ्यात पादुका आसनस्थ झाल्यात.
कोरोना काळामुळे आषाढी वारीवर मर्यादा आल्यात. मानाच्या १० पालख्यांना प्रत्यकी ४० वारकरी घेऊन आषाढी वारीसाठी परवानगी मिळाली. १९ रोजी थाटात ४० वारकरी घेऊन मुक्ताई पालखी शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाली होती. पंढरीत मुक्ताई मठात विसावलेला हा सोहळा पांडुरंगाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान, ज्ञानोबाराय भेट आदी विधी करून शनिवारी रात्री पंढरीतून मुक्ताईनगरकडे परतीच्या प्रवासाला निघाला होता. रविवारी दुपारी मुक्ताईनगरात दाखल झाला.
कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून वारकरी आषाढी वारीला मुकले आहेत. अशात मुक्ताई पालखीचे स्वागत आणि दर्शन करण्यास भाविक उत्साही होते.
संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पांडुरंग परमात्मा, आई मुक्ताई आणि भाविकांचे आभार मानत पालखी सोहळ्याबाबत आनंद व्यक्त केला. पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, उद्धव महाराज हरणे यांनी गेल्या सहा दिवसाचा अपूर्व आनंद अनुभव भाविकांसोबत कथन केला.
फोटो - २६ एचएसके ०२
मुक्ताई पालखी सोहळा परतीचे स्वागत करताना भाविक.