जळगाव : सुरेशदादा, हा एक दातृत्त्वाचा अखंड झरा आहे. स्पष्टवक्तेपणा, क्षमाशिलवृत्ती, माणसे घडविणारा माणूस हे त्यांच्यातील गुण मला भावले. अनेक संकटे आली मात्र कुटुंबीय आणि समाजाची समर्थ साथ मिळाल्याने त्यावर मात केली, हे शब्द आहेत, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या सुविद्य पत्नी रत्नाभाभी जैन यांचे.गुरुवार, २२ रोजी सुरेशदादा हे ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दादांना आयुष्यभर खंबीरपणे साथ देणाऱ्या रत्नाभाभी यांच्याशी ‘लोकमत’ने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संवाद साधला. दादांसोबतच्या सहजीवनाचा प्रवास रत्नाभाभी यांनी मनमोकळेपणाने उलगडला. अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो त्यांच्याच शब्दात....दादांनी मदतीसाठी नेहमीच हात पुढे केला. त्यासाठी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही.पुढे राजकारणात रमेशदादाही आले. मधू जैन यांनाही राजकारणाच आवड असल्याने त्याही राजकारणात आल्या.आयुष्यात कधी स्वार्थ साधला नाहीस्वत:च्या मुलांसाठी कधी कुणाकडे वशिला लावला नाही की कधी शब्द खर्च केला नाही. मात्र समाजासाठी दादांनी खूप प्रयत्न केले. कुणाला मेडिकलला तर कुणाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नसेल तर दादांनी प्रयत्न केले. हे करीत असताना स्वत:च्या शैक्षणिक संस्था मात्र काढल्या नाही. आपले कार्यकर्ते, समर्थकांना संस्था काढण्यासाठी मदत केली. स्वत: शैक्षणिक संस्था उभ्या केल्या असत्या तर आज ‘एसडी-सीड’च्या मुलांना लाभ झाला असता, असे मला वाटते. मात्र दादांनी उभ्या आयुष्यात कधी स्वार्थ साधला नाही. त्यांचा दातृत्त्वाचा हा गुण मला भावला.संकटे आली मात्र जनसेवेचा यज्ञ अखंडपणे सुरुच ठेवलादादा सर्वांना मदत करीत असतात, ती करीत असताना कधी कुणाला अट घातली नाही. राजकारणापलिकडे ते मदत करतात. गोरगरीबांची हुशार मुले आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून देतात, हे लक्षात आल्यानंतर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याची संकल्पना पुढे आली. डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी हा विचार मांडला. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांच्याशी दादांनी चर्चा केली व ‘एसडी-सीड’ शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न सुरु आहे.कुटुंबावर संकटे आली मात्र दादांनी ही शिष्यवृत्ती कधी बंद केली नाही. जनसेवचा यज्ञ अखंडपणे सुरुच ठेवला.आयुष्यात दादांनी माणसे घडविण्याचे कार्य केले. आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, हाच प्रयत्न दादांचा राहिला. दादांना सोडून गेलेल्यांना दादांनी मोठ्या मनाने माफ केले. क्षमाशील वृत्ती हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण आहे.जळगावचा विकास व्हावा, देशात जळगावचे नाव झळकावे, अशी दादांची खूप इच्छा होती, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यात यशही मिळाले. महिला सुरक्षिततेलाही त्यांनी खूप महत्त्व दिले. पूर्वी जळगावात रस्त्यावरुन जातांना महिलांना भिती वाटायची मात्र दादांनी ही परिस्थिती हळूहळू बदलली व आज जळगाव महिलांसाठी सुरक्षित बनले आहे.आयुष्यात खूप संकटे आली मात्र समाज व कुटुंबाने साथ दिल्याने त्यावर सहज मात केली. त्यांनी कधी हार मानली नाही.राजकारण, समाजकारण करीत असताना दादा कुटुंबीयांनाही वेळ देतात. वर्षभरातून एक-दोनवेळा आम्ही प्रवासही करतो, धार्मिक कार्य, वाचनाची आवडही जोपासतो, असेही रत्नाभाभी जैन यांनी सांगितले.माहेर व सासर असे वेगळे वाटलेच नाहीअजिंठ्याच्या पायथ्याशी असलेले तोंडापूर (ता.जामनेर) हे माझे माहेर. या गावाचे तहहयात सरपंच असलेल्या बस्तीमलजी (बाबूशेठ) यांची मी कन्या. गावाचा विकास करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी आपला देह झिजविला. राजकारण, समाजकार्य असेच वातावरण सासरी जळगावातही होते. त्यामुळे सुरेशदादा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर तोंडापूरहून जळगावी सासरी आल्याने वेगळे असे वाटले नाही.कुटुंबीयांच्या आग्रहास्तव दादा राजकारणातसासरे भिकमचंद जैन हे राजकारणात होते. त्यांची धुरा सांभाळण्याची जबाबदारी कुटुंबीयांच्या आग्रहास्तव सुरेशदादा यांनी स्वीकारली. मुळात दादा राजकारणी नाहीत, असे मला वाटते. कारण ते स्पष्टवक्ते आहेत. राजकारणात गोड बोलावे लागते. मात्र दादा हे रोखठोक स्वभावाचे आहेत. राजकारणात आल्यानंतर दादांनी जनसेवेचा यज्ञ सुरु केला तो अखंडपणे सुरुच आहे.कुटुंबाकडे दुर्लक्ष नको म्हणून राजकारणात आले नाही...समाजकारणाची प्रचंड आवड असल्याने मीही राजकारणात येवू शकले असते. तशी आयुष्यात अनेकदा संधीही आली. आग्रही झाला. मात्र सुरेशदादा हे पूर्णवेळ राजकारणात असल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी राजकारणात आले नाही. मुलांचे संगोपन व संस्काराकडे लक्ष दिले. कारण मुले हीच संपत्ती आहे. चांगल्या संस्कारामुळे आजही मुले माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत.मुले राजकारणात नको...दादांचाही पाठिंबाराजकारणात घराणेशाही आपण बघतो, मात्र दादांनी मुलांना राजकारणात आणले नाही. आपली मुले राजकारणात यावी अशी माझीही इच्छा नव्हती. त्यास दादांनीही पाठिंबा दिला. कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, असेच दादांचे प्रयत्न राहिले. त्यामुळे अनेकांना मोठ्या पदावर संधी मिळाली, हे जळगावकर अनुभवत आहेत.शब्दांकन : विकास पाटील
सुरेशदादा जैन यांचे दातृत्व व स्पष्टवक्तेपणा भावला - रत्नाभाभी जैन यांनी उलगडला सहजीवनाचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:36 PM
सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस
ठळक मुद्देआयुष्यात कधी स्वार्थ साधला नाही