जळगाव : गावातील एकाही नागरिकास लस देऊ देणार नाही...तुम्ही माझे काहीही करू शकत नाही अशी धमकी देत विनायक संतोष सपकाळे नामक तरुणाने धामणगाव प्राथमिक केंद्रात प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर या तरुणाने चक्क केंद्रावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाची कॉलर पकडून नंतर त्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. विनायक सपकाळे हा आई-वडिलांसह लसीकरणासाठी शुक्रवारी सकाळी केंद्रावर आला होता. मात्र, केंद्रावर गर्दी झाल्यामुळे विनायक याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोरजोराने केंद्रातील केंद्रातील डॉक्टरांना शिवीगाळ करू लागला. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी धर्मेंद्र विलास ठाकूर हे बंदोबस्ताला होते. त्यांनी तरुणीला शांतता ठेवण्याचे सांगत लसीकरण बंद झाले असून, घरी जाण्याचे सांगितले.
मी हायकोर्ट व सुप्रिम कोर्टालाही बघून घेईल
घरी जाण्याचे सांगितल्याचा राग येऊन विनायक याने चक्क पोलीस कर्मचारी धर्मेंद्र ठाकूर यांची कॉलर पकडली. त्यानंतर त्याला मारहाण केली. या मारहाणीत नाकाला दुखापत झाली. एवढेच नव्हे तर पोलीस, डॉक्टर लसीकरण कसे करता ते बघतो. यानंतर गावात एकाही नागरिकास लस देऊ देणार नाही. तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी हायकोर्ट व सुप्रिम कोर्टालाही बघून घेईल, अशी दमदाटी व धमकी सुद्धा विनायक याने पोलिसांना व डॉक्टरांना दिली. अखेर याप्रकरणी धर्मेंद्र ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गोंधळ घालणाऱ्या तरुणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.