जळगाव : श्यामाप्रसाद मुखर्जी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील भगवती पान व जनरल स्टोअर्समध्ये अज्ञात चोरट्याने डल्ला मारीत सुमारे १५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरट्याने दुकानाचे कुलूप न तोडता चक्क दुकानाच्या भींतीमध्ये एक ते दीड फुटापर्यंत फोडून आत प्रवेश करून चोरी केली आहे. त्यामुळे लहान मुलांचा चोरीसाठी वापर केला गेला असावा, असा संशय वर्तविण्यात आला आहे.
शिवाजी नगरात वास्तव्यास असलेले आनंदा बाबुलाल पाटील यांचे श्यामाप्रसाद मुखर्जी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भगवती पान व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. ते दिव्यांग असून गेल्या आठ वर्षांपासून दुकान चालवून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी आनंदा हे रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरटे हे दुकानाच्या शेजारील मुतारीवर चढले. त्यांनी भगवती दुकानाची भींत फोडून आत प्रवेश केला. नंतर गल्ल्यातील ७ हजार ५०० रूपयांची रोकड व ७ हजार ४८० रूपयांचे बॉडी स्प्रे, साबण, परफ्युम, तेल बॉटल, सिगारेट चोरून नेले.
पान टपरी चालकाच्या लक्षात आली घटना
गुरूवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानाच्या शेजारी असलेल्या पानटपरी चालक रमेश सपकाळे यांना आनंदा यांच्या दुकानाची भींत फोडलेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच आनंदा पाटील यांना फोनद्वारे कळविली. आनंदा पाटील यांनी लागलीच दुकान गाठले. कुलूप उघडून दुकानात पाहिले असता, रोकड व काही साहित्य चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले.
घरपट्टी भरण्यासाठी ठेवलेली रक्कम चोरट्यांनी लांबविली
चोरी झालेली साडेसात हजार रूपयांमधील साडे सहा हजारांची रक्कम ही घर पट्टीची होती. बुधवारी भरणा करण्यास उशिर झाल्यामुळे ती रक्कम दुकानात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी घरपट्टीची रक्कम भरणार होतो, मात्र चोरट्यांनी संपूर्ण रक्कमची चोरून नेल्याचे आनंदा पाटील यांनी सांगितले.