महिंदळे, ता. भडगाव : ‘जो करी मृगाची पेरणी त्यांची होय आबादानी’, कारण शेतकऱ्यांच्या मते मृग नक्षत्रात जर पेरणी झाली, तर उत्पन्न चांगले येते. याच मृग नक्षत्राच्या शेवटी परिसरात तोकडा पाऊस झाला. मृग नक्षत्रात पेरणी करण्याच्या घाईत व हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पावसाळी कपाशी लागवड व पेरणीही केली; परंतु पिकांची उगवण होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र या पिकांना करावी लागत आहे.
दमदार पाऊस जर आला नाही, तर दुबार पेरणीचे संकट परिसरावर येईल.
दमदार पाऊस नसल्यामुळे पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी व कपाशी लागवड केली आहे, ती पिके जमिनीतून वर येण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. असे झाल्यास परिसरावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
शेतकऱ्यांची महागडी बियाणे जमिनीत पडली आहेत.
परिसरात विहिरींच्या तोकड्या पाण्यावर व ठिबक सिंचनाच्या साहाय्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली आहे. पिकेही आतापर्यंत दमदार होती; परंतु पावसाचा एक महिना निघून जात आहे. तरी परिसरात दमदार पाऊस नाही. विहिरीतील होते तेवढे पाणी आता संपले आहे. पिके एक महिन्याची झाल्यामुळे त्यांना मुबलक पाण्याची आवश्यकता आहे; परंतु विहिरींनी तळ गाठल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात उन्हाचा तडाखा पिकांना बसत आहे.
मृग नक्षत्राने दाखवली पाठ, आता आर्द्राची आस
भडगाव तालुक्यात आतापर्यंत ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, महिंदळे परिसरात तोकड्याच सरी बरसल्या. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना पावसाची आशा होती; परंतु मृग सरी तुरळकच बरसल्या. आता मात्र शेतकऱ्यांना आर्द्रा नक्षत्राची आस आहे. या नक्षत्रात तरी दमदार पाऊस पडेल व खोळंबलेल्या पेरण्या पूर्ण होतील. या आशेत बळीराजा आकाशात येणाऱ्या ढगांकडे टक लावून पाहत आहे.
===Photopath===
260621\26jal_5_26062021_12.jpg~260621\26jal_6_26062021_12.jpg
===Caption===
महिंदळे परिसरातील तळ गाठलेल्या विहिरी.पावसाळी पेरणी केलेली पिके जमिनीत अडकली.~महिंदळे परिसरातील तळ गाठलेल्या विहिरी.पावसाळी पेरणी केलेली पिके जमिनीत अडकली.