जळगाव /भुसावळ : लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या मजुरांना चहा आणण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा दीपनगर येथील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या बेदम मारहाणीत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, प्रवीण नामदेव बºहाटे रा. फेकरी यांच्या मुलीचे मंगळवारी गावातच लग्न होते. यासाठी रात्री लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या हलवाई व इतर मजूर घरी आले होते. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यासाठी चहा घेण्यासाठी संजय बळीरात बºहाटे (वय-४६) रा. फेकरी ता. भुसावळ हे दीपनगर औष्णिक केंद्राच्या कॅण्टीनमध्ये जात असताना त्यांना गेट क्रमांक २१० जवळ उभे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षक कर्मचारी सागर मोरे, योगेश (पूर्ण समजू शकले नाही), राजेश बनसोडे यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर ध् संजय बºहाटे यांना तिघांनी बेदम मारहाण केली. तर कायमस्वरूपी नियुक्त असलेल्या सुरक्षा अधिकारी लोकरे यांनीही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यात संजय बºहाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तिघे खासगी सुरक्षा रक्षक फरार झाले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने भुसावळातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.मयत संजय बºहाटे यांचा मृतदेहा जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, आई-वडील, दोन बहिणी , मुलगा तेजस आणि मुलगी सेजल असा परीवार आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून सुरक्षा अधिकारी लोकरे यांना ताब्यात घेतले असून सागर मोर, सुरक्षा अधिकारी लोकरे आणि इतर दोघे असे एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण कुंभार करीत आहे.
चहा घेण्यासाठी गेले आणि परतलेच नाही, दीपनगर येथे सुरक्षारक्षकांच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:44 PM