जगभर अनेक पातळ्यांवर चाललेल्या चर्चेतून आणि बाहेर येणा-या माहितीतून आता हे स्पष्ट होत चालले आहे की, कोरोना हे नैसर्गिकरित्या आलेले संकट तर नाहीच नाही. पण मानवनिर्मित असले तरी एकमेकांवर कुरघोडी करायच्या राक्षसी महत्वाकांक्षेतून लादण्यात आले आहे. सगळ्या जगाची सर्वच स्तरावरची घडी विस्कटून टाकणा-या या संकटाने आपल्याला दु:खाच्या व आर्थिक नुकसानीच्या दरीत लोटून दिलेले आहे. ही लढाई शस्त्रे व सैन्य यातून लादलेली नसून रोगाचे विषाणू सोडून एकतर्फी सुरू झाली आहे. चीननेच हे संकट जगाच्या माथी लादले आहे. याला प्रत्यक्ष नव्हे पण घडलेल्या घटनांवरून बरेच अप्रत्यक्ष आधार मिळत आहेत. त्यावरून जागतिक रंगमंचावर अमेरिकेवर व एकूणच जगावर वर्चस्व गाजविण्याच्या अत्यंत महत्वाकांक्षी व कुटील कारस्थानांना रशिया व चीन यांनी मिळून १० वर्षाआधीच प्रारंभ केला आहे असे म्हणता येते.९ एप्रिल २०२० पर्यंत २१३ देशात १५ लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले असून, ८८ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सगळ्या विकसित देशांनी आज या संकटापुढे गुडघे टेकले आहेत. अविकसित देशांचीही तीच गत आहे.एकाचे संकट ही दुस-यासाठी संधी असतेच. हेच सूत्र वापरून दुस-यावर संकट आणण्यासाठी तंत्रज्ञान वापरून जागतिक मोठा आर्थिक घातपात घडवून आणायचा व त्यातून स्वत:चा प्रचंड फायदा करून घेत जगावर वर्चस्व गाजवायचे अशी ही रणनीती. सगळ्या जगात आर्थिक आघाडीवर प्रचंड मोठी पडझड होत असतांना चीनमध्ये मात्र वस्तूंचे उत्पादन व शेअर बाजार उसळी घेत आहेत. रशियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नगण्य आहे. याचे कारण यामागे असलेले हे घातसूत्रच आहे.एक ना एक दिवस हे संकट जाईल यात कुणालाच संदेह नाही. पण प्रश्न आहे कधी आणि त्यानंतर काय? याचे काय काय परिणाम झाले आहेत व होणार आहेत?या संकटाने सा-या जगाला घरी बसून राहणे भाग पाडले. त्याच्या प्रादुभार्वातून कुणीच सुटले नाही. काही देशांचे प्रमुख, तर काही राजे, राजकन्या, राजघराणे इ. लोक बाधित झाले. त्यांनाही सामान्यांसारखेच आवश्यक औषधी व उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. हे काही सामान्य लोक नाहीत. म्हणजे या संकटाचा पहिला परिणाम म्हणून त्याने सगळ्यांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. अगदी बलाढ्य अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तर सामान्य भिक मागणारे सर्वच या संकटासमोर समान झाले आहेत.आता हयात ज्येष्ठ पिढीला विचारता इतके दिवस घरी बसून राहण्याबद्दल कुणालाही असा अनुभव कधीच आला नाही, हेच उत्तर मिळते आहे. हे सगळेच अनाकलनीय आहे. याआधी कधीही घडली नाही, अशी परिस्थिती जगासमोर समोर उभी ठाकली आहे. संकट काळी माणसे इतिहासाची मदत घेतात. पण इतिहासात अशी परिस्थिती कधीच न आल्यामुळे सगळ्यांना आता मागे बघण्याऐवजी पुढे पाहून आज काय करायचे ते आपापले डोके चालवून ठरवावे लागत आहे. उद्या काय होणार हे सांगताच येत नाही. हत्ती व सहा आंधळ्यांची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. आजच्या संकटाचा हत्ती इतका मोठा व अवाढव्य आहे की जागतिक स्तरावरदेखील कुणालाच त्याच्या परिणामांबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. सगळेच आंधळे ठरले आहेत.आज ज्यांना ज्यांना घरी बसून संगणकाच्या मदतीने काम करणे शक्य आहे ते करीत आहेत. म्हणजे तंत्रज्ञान उपलब्ध आहे व ते काम करीत आहे. याचा अर्थ फक्त संगणक तंत्रज्ञान नव्हे; ते तर आता अगदी प्राथमिक गरज झाले आहे. संगणक व इंटरनेट या अगदी आवश्यक गरजा झाल्या आहेत. त्यापुढे जाऊन अनेक बाबींचे तंत्रज्ञान मदतीला येत आहे आणि त्याची व्याप्ती प्रचंड मोठी वाढणार आहे.घरी बसून काम करणे जमते आहे म्हणजे आॅफिसला जाण्याची गरज अत्यंत कमी होत जाणार. ज्या कंपन्यांना कर्मचा-यांसाठी प्रचंड मोठी जागा लागत होती तेथे आता अर्थातच जागा वापरण्याऐवजी घरून काम करण्याचीच प्रथा सुरू होईल. कार्यालयांची कामाची पद्धत बदलेल. म्हणजे कार्यालयीन जागांची गरज व मागणी प्रचंड प्रमाणात कमी होईल. निदान शहरी भागात तरी. शहरांच्या आसपासच्या भागात घरांची मागणी वाढेल. कारण शहरातल्या महागड्या जागा घेण्यापेक्षा थोडे लांब जाऊन स्वस्त घरे घेण्याकडे अर्थातच कल वाढेल.दुसरा परिणाम झाला आहे, तो म्हणजे आयुष्यात खरोखर काय गरजेचे आहे, त्याच्या प्राथमिकता या संकटाने बदलल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीच लोक घराबाहेर पडले. म्हणजे काय गरजेचे आहे याच्या भ्रामक संकल्पनामधून लोकांना बाहेर काढण्याचे मोठेच काम या संकटाने केले आहे. टीव्ही वरच्या किंवा छापील माध्यमातून येणा-या जाहिरातींवरही याचा मोठा परिणाम नक्कीच झाला आहे. पुढेही होईल.कुटुंबासोबत असणे किती महत्वाचे आहे, हे या संकटाने एकही शब्द न उच्चारता लहान थोरांना पक्के पटवून दिले आहे. काम मिळते म्हणून गाव वा शहराबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर जाणा-यांना आता याचा नक्कीच विचार करावा लागेल. या संकटामुळे निर्माण झालेल्या भीतीचा पगडा लोकांच्या मनावर काही काळ तरी राहील.संकट काळात वापरायला पैसे हाताशी असायलाच हवेत. ही गरज कधी नव्हे इतकी लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणजे ज्यातून लगेच पैसे हातात येतील अशा गोष्टीत गुंतवणुकीकडे कल वाढेल. आपटलेले शेअर बाजार हेच सांगत आहेत. भारतात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे भाव उतरले. पण ते तसेच राहतील असे सांगणे धारिष्ट्याचे होईल. आता सोन्याचे भाव हा मोठ्ठाच अभ्यासाचा विषय झाला आहे. रोखीने व्यवहार ब-याच अडचणींमुळे अपरिहार्य होत आहेत. ते करू नका, असे सांगणे आता कठीण होईल. कारण ते टाळणेदेखील शक्य होणार नाही.काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध नाटककार कै.वसंत कानेटकर जळगावला आले होते. त्यांच्या जाहीर भाषणात ते म्हटले होते की, 'स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीला कधीही युद्ध व त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत म्हणून ही पिढी निर्धास्त, बेजबाबदार व बेगुमान झालेली आहे. त्यांनी एकदा तरी युद्धाच्या परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय त्यांना त्यांच्या सुखवस्तूपणाची जाणीव होणार नाही.' मला वाटते आताची परिस्थिती ही युद्धजन्यच आहे व युद्धाचेच अनुभव सगळ्यांना देणार आहे. (पूर्वार्ध)-सी.ए. अनिलकुमार शाह, जळगाव
‘कोरोना’नंतर काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 2:07 PM