रिॲलिटी चेक
जळगाव : एखादा कायदा व नियम जेव्हा तयार होतो, तो सरसकट सर्वांसाठी सारखाच असतो. मग कायदा राबविणारी यंत्रणा असली तरी त्यांनाही ते नियम लागू होतात, असा कायदा सांगतो, मात्र शहरातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांकडूनच बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. शनी पेठ व रामानंद नगर या दोन पोलीस ठाण्यांमध्ये तर वाहन पार्किंगला जागाच नाही. रामानंद नगर पोलिसांचा गाडा तर भाड्याच्या इमारतीतून हाकला जात आहे.
वाहतुकीचे नियम असो की इतर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे. नो पार्किंग असो की रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहने पार्किंग केली की वाहनधारकावर मोटार वाहन कायदा २२ (२) (एस) १७७ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते मे या पाच महिन्यात शहरात अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,८८३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर झालेली आहे, पोलिसांवर कारवाईच झालेली नाही. दोन वर्षापूर्वी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी हेल्मेट न परिधान केलेल्या पोलिसांवर कारवाई केली होती.
पोलिसांना नियम लागू नाहीत का?
रामानंद नगर पोलीस ठाणे
रामानंद नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली असता काही पोलीस अंमलदारांनी पटांगणात दुचाकी पार्किंग केली होती तर काही जणांनी तारेच्या कंपाऊंडला लागूनच दुचाकी पार्किंग केल्या होत्या. या पोलीस ठाण्यात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आजूबाजूला जेथे जागा मिळेल तेथे वाहन पार्किंग करतात.
शनी पेठ पोलीस ठाणे
शनी पेठ पोलीस ठाण्याची जागाच मुळात कमी आहे. या पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकी व चारचाकी पार्किंगची व्यवस्था नाही. पोलीस ठाण्याचे वाहन देखील पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदाराच्या दरवाजासमोरच पार्किंग करावे लागते. पोलीस कर्मचारी व सामान्य व्यक्ती यांना कंपाऊंडला लागून रस्त्यानजीकच वाहने पार्किंग करावी लागत आहे.
तीन पोलीस ठाण्यात पार्किंगच नाही; कारवाई कोण करणार
रामानंद नगर, जळगाव शहर व शनी पेठ या तीन पोलीस ठाण्यात अधिकृत पार्किंगच नाही. एमआयडीसी, जिल्हा पेठ व तालुका या तीन पोलीस ठाण्यात जागा प्रशस्त असल्याने पार्किंगची व्यवस्था आहे. येथे पोलीस व सामान्य लोकांची वाहने पार्किंग केली जातात. एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाहेर रस्त्यावरही वाहने पार्किंग केली जातात.
कोट...
नो पार्किंगमध्ये वाहन दिसले की त्यावर कारवाई केली जाते. पोलिसांच्या वाहनांनाही मेमो देण्यात आलेले आहेत. वाहन बेशिस्त पार्किंग केलेले दिसले की तेथे मालक नसला तरी फोटो घेऊन चलन बनविले जाते. ते वाहन पोलिसाचे आहे की आणखी कोणाचे हे तेव्हा कळतच नाही.
-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
शहरातील नो पार्किंग कारवाई
२०१९ : ६६८
२०२० : ४५२
२०२१ (मे पर्यंत) : १,८८३
--