लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना संसर्गाची झळ निराधार, अपंग, अनाथ यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थानाही बसत आहे. वर्षभरापासून या सामाजिक संस्थांची आर्थिक मदत थांबल्याने निराधारांनी काय खायचे, कसे राहायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून निराधार, अपंग, मतिमंद, गतिमंद यांचा सांभाळ करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या असून, अजूनही त्या यातून सावरलेल्या नाहीत. निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना दाते आपापल्या परीने मदत करत होते. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाने ही मदत थांबली आहे.
जळगावातील आश्रय माझे घर या मतिमंद, गतिमंद मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेचा व मातोश्री वृद्धाश्रमातील आढावा घेतला असता येथील स्थिती समोर आली.
मतिमंद, गतिमंद असलेल्या मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंतच शासनाकडून त्यांचा सांभाळ केला जातो. त्यानंतर मात्र ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा मुलांचा जळगावातील आश्रम माझे घर ही संस्था सांभाळ करते. सध्या या संस्थेत असे २२ जण असून, गेल्या वर्षभरापासून मोठी आर्थिक अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे मातोश्री वृद्धाश्रमातदेखील मदतीचा ओघ कमी झाल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मातोश्री वृद्धाश्रमात सध्या ३५ जण आहेत.
खाऊसाठी पैसे मिळेनात
संस्थेमध्ये असणाऱ्या गतिमंद, मतिमंद मुलांना दररोजच्या जेवणासोबत खाऊ व इतर वस्तू मिळाव्यात, यासाठी दाते मदत करीत असतात. अनेकजण अशा वस्तू या मुलांना आणून देतात. मात्र, वर्षभरापासून या मुलांनी खाऊ पाहिलेला नाही, इतकी बिकट परिस्थिती याठिकाणी उद्भवली आहे. इतकेच नाही, तर काही मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना अनेकजण मदत करीत असतात. मात्र तेदेखील बंद झाले आहे.
जे मिळेल त्यावर दिवस काढायचा
येथील मुलांना खाऊ व इतर वस्तूंसाठी मिळणारी मदत बंद झाल्याने आता जे मिळेल त्यात दिवस काढायचा असा दिनक्रम या संस्थांमध्ये झाला आहे. गतिमंद, मतिमंद मुलांची स्थिती पाहिली तर कोरोना काय आहे, हेच त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर उद्भवलेली स्थिती कशामुळे आली, यापासून देखील ते अनभिज्ञ आहेत.
औषधोपचार पालन-पोषणावर भर
मदत मिळणे बंद झाले असली तरी दररोजचे जेवण व संस्थांमध्ये असलेल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने दररोजच्या जेवणासह केवळ औषधोपचार यावरच खर्च करण्यावर भर दिला जात आहे. याव्यतिरिक्त इतर खर्च करणे शक्यच नसल्याचे सांगण्यात येत आहे. औषधोपचार पालन-पोषण करतानाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात
संस्थांमध्ये असलेल्यांना मदत मिळणे बंद झाली असताना तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार करतानादेखील अडचणी येत आहे. अनेकांचे पगार रखडले असून, काही जणांना कमी प्रमाणात पगार देऊन त्यांचाही उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
------------------
कोरोनाचा संसर्ग उद्भवला तेव्हापासून संस्थांना मिळणारी आर्थिक मदत बंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या मुलांचे पालन-पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जी काही मदत मिळते, त्यावर पालन पोषण व औषधोपचार करण्यावर भर दिला जात आहे.
- रेखा पाटील, संचालिका, आश्रय माझे घर
संस्थांना मिळणारी मदत कमी झाली असून, अनेक उपक्रम राबविता येत नाहीत. तसेच साहित्य खरेदी करतानाही विचार करावा लागतो. देणगीदार कमी झाले असले तरी त्यांच्याही अडचणी आहेत, हे समजून कमीत कमी खर्चात संस्थांचा खर्च भागविण्यावर भर आहे.
- सागर येवले, मातोश्री वृद्धाश्रम