लोकमत न्यूज नेटवर्क
आकाश नेवे
जळगाव : राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती आहे, याबाबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नोंदी आहेत. एका खासगी कंपनीने महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात केलेल्या अहवालात शहरातून जाणाऱ्या मार्गाची रुंदी ही ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्रानुसार या रस्त्याची रुंदी ही ६० मीटर आहे. हा रस्ता भविष्यातील रहदारीला अपूर्ण पडेल, याच शक्यतेवर महामार्ग शहराच्या बाहेरून वळवण्यात आला आहे.
महामार्गाच्या कामासाठी एका खासगी कंपनीने चौपदरीकरणाचे सर्वेक्षण केले होते. त्यात शहरातून जाणारा रस्ता हा ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी तो ४० मीटर तर काही ठिकाणी ६० मीटर आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली असल्याचेही त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र त्याचसोबत २१ जून २०१७ ला जळगाव बायपास संदर्भात नागपूर कार्यालयाने तत्कालीन मुख्य व्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. त्यात एल.एन. मालवीय यांच्या रिपोर्टचा आधार घेत हा रस्ता पूर्ण ६० मीटरचा असून त्यानुसार येथे चार लेनचा रस्ता करता येऊ शकतो, असेदेखील म्हटले आहे. तसेच या पत्रात काही ठिकाणी रस्त्यांचे वळण पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीचा काही भाग ताब्यात घ्यावा लागेल, असेही म्हटले आहे.
याबाबत शहरातील आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयाला २०१७ मध्ये एक पत्रदेखील लिहिले होते. त्या पत्रातही त्यांनी या खासगी कंपनीने अर्धवट माहितीच्या आधारे रिपोर्ट तयार केला असल्याचा उल्लेख केला आहे.
४७ वर्षात रस्त्याचा विकासच नाही
पाळधी ते तरसोद या टप्प्यात ६० मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता १९७० च्या सुमारास फक्त ९ मीटर होता. त्यानंतर रहदारी वाढली, शहर वाढले तरीदेखील हा रस्ता फक्त ९ मीटरचाच राहिला. त्या डांबरीकरणाच्या पलीकडे त्याचा विकास कधीही करण्यात आला नाही. शहरात समांतर रस्त्यांची समस्या कायमच राहिली. प्रमुख चौक हे अपघातप्रवण बनले. मात्र २०१७ पर्यंत या रस्त्याचा विकासच झाला नाही. त्यानंतर शहरांतर्गत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.