नियमांचे उल्लंघन : दीड महिन्यानंतर मोबाईल दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून शासनाने लावलेले निर्बंध १ जून पासून काहीसे शिथील करण्यात आल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची सकाळपासून गर्दी होत आहे. त्यात, मुख्य म्हणजे मोबाईलच्या दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. बहुतांश दुकानांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही नियम पाळले जात नसल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आली.
१ जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी सवलत दिल्याने बाजार पेठेतील सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. शासनाच्या सूचनेनुसार व्यावसायिकांकडून नियमांचे पालन करण्यात येत असले तरी ग्राहक नियम धाब्यावर बसवून गर्दी करतांना दिसून येत आहे. विशेषतः मोबाईल दुकानांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. दीड महिन्या पासून दुकाने बंद असल्याने, कुणाला मोबाईलची बॉडी बदलायची आहे, कुणाला स्क्रीन बोर्ड बदलायचा आहे तर कुणाला नवा मोबाईल खरेदी करायचा आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारच्या ग्राहकांची मोबाईल दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसून येत आहे.
इन्फो :
मोबाईलचे कारण काय :
१) स्क्रीन गार्ड खराब झाले.
२) मोबाईल बॉडी बदलायची आहे.
३) मोबाईलची स्क्रिन नवीन टाकायची आहे
४) मोबाईलची सिम प्लेट बदलायची आहे.
५) मोबाईल मध्ये नवीन बॅटरी टाकायची आहे.
६) मोबाईलची सर्व्हीसिंग करायची आहे, तर कुणाला फाॅरमेट करायचा आहे.
७) कुणाला नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे.
अशा प्रकारच्या विविध ग्राहकांची मोबाईल दुकानांवर गर्दी दिसून येत आहे.
इन्फो :
दीड महिन्यापासून बाजार बंद
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला १५ एप्रिलला संचारबंदी लागू केली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शासनाने पुन्हा १ मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. तब्बल ३१ मे पर्यत कडक लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ पुर्णतः बंद होती. दरम्यान, यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
इन्फो :
दीड महिन्यापासून मोबाईल दुकानेही बंद
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये इतर बाजारपेठांप्रमाणे शहरातील मोबाईल मार्केट ही बंद होते. शहरातील गोलाणी मार्केट मध्ये मोबाईलची १०० हुन अधिक दुकाने असून ही सर्व दुकाने बंद होती. तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरही बंद असल्याने, मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. तर दुसरीकडे मोबाईल व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
इन्फो :
मोबाईल महत्वाचाच, पण आरोग्याचे काय?
१) माझ्या मोबाईलची स्क्रीन तुटल्यामुळे ती बदलावायला आलो होतो. स्क्रीन व्यवस्थित दिसत नसल्याने, मोबाईल दुरुस्त करणे गरजेचे आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी, मी मास्क व सॅनिटाइजरचा वापर करत आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही.
यश पाटे, ग्राहक
मोबाईल ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे. त्यात बिघाड झाला म्हणजे लगेच दुरुस्ती करावाच लागतो. माझ्या मोबाईललाही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. कोरोना असला तरी, किती दिवस कोरोनाची भीती बाळगणार आहे.
सुनील येवले, ग्राहक
इन्फो :
दीड महिन्या पासून मोबाईल दुकान बंद असल्याने, ग्राहकांची कामे अडून पडलेली होती. त्यामुळे ग्राहक मोबाईलच्या कामासाठी गर्दी करत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे मी पालन करत आहे. दुकानात गर्दी होऊ नये, म्हणून सोशल डिस्टनिंगचे पालन करून ग्राहकांना दुकानात सोडण्यात येत आहे.
उमेश कोतकर, मोबाईल व्यवसायिक
खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आम्ही मास्क वापरणे व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन करत असतो. यात काही ग्राहक ऐकतात तर काही ऐकत नाही. मात्र, शक्य तितकी आम्ही काळजी घेतच असतो.
सनी आहुजा, मोबाईल व्यावसायिक