जळगाव : जिल्हा रुग्णालयाने कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर ३ कोटी ७१ लाख ५४ हजार १३० रूपयांचे ३० व्हेंटिलेटर खरेदी केले. मात्र, हे व्हेंटिलेटरच वेगळे असल्याचा मुद्दा माहिती अधिकारात समोर आला व चौकशी अहवालात तक्रारीवर शिक्कामोर्तब झाले. जर या प्रकरणात तक्रारच झाली नसती तर काय झाले असता. असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
लक्ष्मी सर्जिकल्स यांच्याकडून हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. यात श्रीयांश कंपनीचे हे व्हेंटिलेटर अक्षय या कंपनीकडून असेंम्बल्ड करण्यात आले होते. शिवाय याची बाजार किमंत व प्रत्यक्षात खरेदी झालेली किमंत यातही मोठी तफावत असल्याचा मुद्दा तक्रारदार दिनशे भोळे यांनी उपस्थित केला होता.
कोट
व्हेंटिलेटरबाबत केलेली तक्रार सत्यात उतरली आहे. अशाच प्रकारे अन्य खरेदींबाबतही तातडीने चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे. यासह जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही. तो पर्यंत मोहाडी रुग्णालयातील ते व्हेंटिलेटर एजन्सीच्या ताब्यात देण्यात येऊ नये . दिनेश भोळे, माहिती अधिकार कार्यकर्ते
उपस्थित झालेले प्रश्न
१ मॉडेल व नंबर बदललेले असतानाही व्हेंटिलेटरचे इन्स्टालेशन कसे केले जात होते.?
२ तक्रारदार मोहाडी रुग्णालयात पोहचले नसते तर इन्स्टॉलेशन होऊन व्हेंटिलेअर स्वीकारले गेले असते का?
३ तक्रार झाल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. अन्यथा हेच व्हेंटिलेटर ठेवून घेतले असते का?
४ पुरवठादाराने कमी गुणवत्तचे व्हेंटिलेटर दिले यासह ही प्रक्रिया राबविणारे अधिकारी यांच्यावर कारवाई होईल का?
५ कोणत्या तज्ञाकडून तपासणी का झाली नाही?
लक्ष्मी सर्जीकल्सबाबत...
लक्ष्मी सर्जीकल्स ॲन्ड फार्मा यांचे दुध फेडरेशनजवळ कार्यालय आहे. सुनील नवीनचंद्र खोना हे संचालक असून त्यांनी प्राथमिक स्तरावर आरोप झाल्यानंतर खुलासा सादर केला होता. त्यात म्हटल्यानुसार लक्ष्मी सर्जीकल्स ॲन्ड फार्मा या फर्मच्या माध्यमातून १७ वर्षात देशभरात व्यावसायिक प्रतिष्ठा निर्माण केली आहे. जगभरातून अद्यावत वैद्यकीय साहित्य व उपकरणे आयात करून त्याची फेरविक्री करण्याचे कायदेशी परवाने आहेत. शासकीय अथवा खासगी संस्थांच्या निविदा प्रक्रियांमध्ये भाग घेऊन त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे करार केलेल्या निर्मात्यांकडून वैद्यकीय उपकरणे घेऊन त्यांची पुर्तता करतो, असे खोना यांनी काही दिवसांपूर्वीच्या खुलाशात म्हटले होते. दरम्यान, कंपनीबाबत अतिरिक्त माहितीसाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय कंपनी प्रतिनिधींकडूनही माहिती देण्यात आली नाही. याच एजन्सीकडून जिल्हा रुग्णालयाने ३० व्हेंटिलेटर ३ कोटी ७१ लाख ५४ हजार १३० रुपयात खरेदी केले होते.