जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील हे बोलत होते. यावेळी राजेंद्र चव्हाण, प्रताप पाटील, शिवराज पाटील यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांना जर बाहेर फिरता येत नव्हते तर आदित्य ठाकरे यांनी फिरायला पाहिजे होते. आम्ही तेव्हा हेच सांगायचो. मात्र, तेव्हा ऐकले नाही. आता मात्र शाखेवर जाऊन पक्षाच्या बैठका घेतल्या जात आहेत. ते काम आधीच करणे गरजेचे होते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता, सावंत यांनी आधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी. चार-चार वेळा आमदार राहिलो आहे. जळगाव जिल्ह्यातील ४८ अंशाच्या तापमानात फिरलो आहे, तेव्हा या निवडणुका जिंकता आल्या, हे मुंबईला बसून असलेल्यांना काय कळेल ? असा टोला गुलाबराव पाटील यांनी सावंत यांना लगावला आहे.
दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाचगेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
रस्त्यांची कामे न करणाऱ्या मक्तेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा-गुलाबराव पाटीलमहापालिकेतील काही नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. येत्या काळात अजून काही नगरसेवक पक्षात येतील. महापालिकेतील सत्तेपेक्षा आम्हाला जळगाव शहराचा विकास महत्त्वाचा असून, पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र अजूनही हा निधी खर्च करता आला नसल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच शहरातील रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करण्यात येणारच आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराकडून रस्ते दुरुस्तीचे काम करून घेण्यात यावे; अन्यथा या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे किंवा मग थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.