सद्गुरु संत सखाराम महाराज अमळनेर यांच्या वारीसाठी बेलापूरकर महाराजांची वारी ही सर्वात जुनी वारी. अमळनेर वारीला साधारणतः २५० वर्षांचा काळ झाला आहे. ती आजतागायत अव्याहतपणे चालू आहे, या सद्गुरुंच्या वारीला अनन्यसाधारण अशा प्रकारचे महत्त्व आहे. अमळनेरकर महाराज आणि बेलापूरकर महाराज यांचे गुरु-शिष्याचे नाते आहे.
बेलापूरकर महाराजांच्या गादीवरील मूळपुरुष संत शाहूदादा हे दरमहा पंढरीच्या वारीचे निस्सीम वारकरी होते. शाहूमहाराज बेलापूर-पंढरपूर अशी पंढरीची दरमहा वारी करत असत. तशीच वारी ते पैठण, आळंदी, त्र्यंबकेश्वरची करायचे. शाहूमहाराज वारीला आल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ओरीमध्ये उतरत असत आणि सखाराम महाराजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ओरीमध्ये उतरत असत. काही काळ गेल्यानंतर शाहूमहाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला की, अरे तू माझ्या सगळ्या वाऱ्या करतोस; पण तू गुरु केला पाहिजे, कारण ‘गुरुविण अनुभव कैसा कळे’ म्हणून स्वतः पांडुरंगाने सांगितले की, तू अंमळनेर येथील सखाराम महाराजांना गुरु कर. हा सर्व दृष्टान्त शाहूमहाराजांनी सखाराम महाराजांना सांगितला आणि सखाराम महाराजांनी पंढरी येथील पांडुरंगाच्या गाभाऱ्यात संत शाहूमहाराजांना अनुग्रह दिला.
नंतर परत गेल्यानंतर पांडुरंगाने पुन्हा शाहूमहाराजांना स्वप्नात जाऊन सांगितले की, गुरुंची वारी कर; पण शाहूमहाराज हे दरमहा पंढरीचे वारी करत होते. शाहूमहाराजांनी विचारले माझ्या गुरुंची वारी कधी असते... वैशाख वारी... शाहूमहाराजांनी पांडुरंगाला प्रश्न केला, अरेपण तुझी पंढरपूरची वारी चुकेल ना. देवांनी सांगितले, अरे तू काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर येतो. मग शाहूमहाराजांनी देवाला विचारले, अरे तू माझ्याबरोबर आहेस याचा पुरावा काय? देवाने सांगितले की, अमळनेरला बोरी नदीस भरउन्हाळ्यात पाणी नसते तर मी तुला पाण्याच्या रूपाने तुला दर्शन देईन. मग शाहूमहाराज १०००-१५०० वारकऱ्यांना घेऊन गुरुंच्या वारीस निघाले. त्याकाळी १००-१५० बैलगाड्या असत. अमळनेरपासून ३ किमी अलीकडे एका शेतात शाहूमहाराजांची दिंडी मुक्कामास थांबली, इकडे सखाराम महाराजांना देवाने स्वप्नात जाऊन सांगितले की, मी तुझ्या शिष्याबरोबर आलोय तू मला घ्यायला ये, मग लगेच सखाराम महाराजांनी आपल्या सर्व लवाजमा घेऊन आपल्या शिष्यरूपी पांडुरंगाला घेण्याकरता आले आणि त्यांना वाजतगाजत अमळनेर नगरीत आणले.
गुरु-शिष्याचा भेटीचा सोहळा ज्या वेळेस वाळवंटात पोहचला तेव्हा बोरी नदी भरभरून वाहू लागली, देवाने दिलेल्या दृष्टांतानुसार पांडुरंगाने शाहूमहाराजांना पाण्याचा रूपाने दर्शन दिले. आजही वाळवंटात वाळू खोदली की पाणी पहावयास मिळते.
शाहूमहाराजांना वाटले की पंढरीचा पांडुरंग आपल्याबरोबर आहे. शाहूमहाराजांना अश्रू अनावर झाले आणि शाहूमहाराजांच्या मुखातून शब्द निघाले आज माझी पांडुरंगाची पंढरपूरची वारी पूर्ण झाली. आणि मग त्या वर्षापासून गुरुंच्या वारीचा सोहळा सुरू झाला तो आजतागायत गेली २५० वर्षांपासून गुरु-शिष्य परंपरा सुरू आहे. ही परंपरा सद्गुरु संत सखाराम महाराजांच्या गादीवरील ११ वे सत्पुरुष प्रसाद महाराज आणि संत शाहूमहाराज बेलापूरकर महाराजांचे वंशज राखत आहेत. ‘माझ्या वडिलासी मिराशी गा देवा।’ या अभंगाप्रमाणे नववे सत्पुरुष मोहन महाराज ही परंपरा मोठ्या तन्मयतेने चालवत आहेत आणि ही परंपरा पुढेही चालू राहणार आहे, यात तिळमात्र संशय नाही. ‘ऐश्या भाग्या ज्यालो । तरीच धन्य जन्मा आलो।।’ संतांनी सांगितल्याप्रमाणे म्हणावेसे वाटते, ‘याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ।।’ अशीच सद्गुरु संत सखाराम महाराज सेवा करून घेवोत, अशी सद्रूगुरु संत सखाराम महाराज आणि संत शाहूमहाराजांचे चरणी प्रार्थना.
संत सखाराम महाराजांचा शाहूमहाराजांना अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर शाहूमहाराजांना पांडुरंगाच्या गळ्यातला तुळशी हार काढून बडव्यांनी शाहूमहाराजांच्या गळ्यात घातला आणि तुळशीच्या हारातून शाहूमहाराजांना पंचधातूची प्रासादिक पांडुरंगाची मूर्ती मिळाली.
आजतागायत कधी सद्गुरुंची वारी चुकली नाही; परंतु गेल्यावर्षी वारी चुकल्याची तळमळ खूप झाली. परंतु बेलापूरकर फडाचे नित्यनेम हे श्रीगुरु अंमळनेरकर महाराजांप्रमाणे कडक. जगावर कोरोनाचे सावट आहे तरी गेल्यावर्षी पंढरपूर येथे बेलापूरकर महाराजांनी सद्गुरुंच्या वारीचे कार्यक्रम पार पडले. यावर्षी मोठा निर्धार करत कोरोनाच्या संकटकाळातही कमी लोकांत वारीसाठी येता आले म्हणून हे पंढरीराया हे कोरोनाचे संकट निवारण करून पुन्हा एकदा सर्व वारकरींसमवेत मोठ्या प्रमाणात सद्गुरुंची वारी व्हावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
- प्रसन्न बेलापूरकर, मोहन बेलापूरकर महाराजांचे लहान बंधू.