लेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत एका अपार्टमेंटमध्ये एकच नळ कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरात अनेक भागात जुने अपार्टमेंट असून, या ठिकाणी पाण्याची टाकी किंवा समदेखील तयार करणे कठीण आहे. त्यामुळे अशा अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमृत योजनेच्या कामातही मनपा प्रशासनाच्या चुकांच्या प्रतापामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना अनेक बाबीं मनपाने स्पष्ट न केल्याने नागरिकही संभ्रमात आहेत.
नवीन अपार्टमेंटचे बांधकाम होत असताना, आता त्या ठिकाणी अपार्टमेंटचा ठेकेदार स्वतंत्र सम किंवा पाण्याची टाकी तयार करतो. मात्र, याआधी म्हणजेच २० वर्षांपूर्वी झालेल्या अपार्टमेंटमध्ये सम किंवा पाण्याची टाकीदेखील तयार करण्यात आलेली नाही. अशा ठिकाणच्या अपार्टमेंटमध्ये एकच कनेक्शन देणे कठीण आहे. अशा ठिकाणी फ्लॅटधारकांना स्वतंत्र कनेक्शन देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासह सम किंवा पाण्याची टाकी तयार करणेही अशा अपार्टमेंटधारकांना शक्य नाही. त्यामुळे जुन्या अपार्टमेंटधारकांबाबत मनपा प्रशासनाने स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकदेखील संभ्रमात आहेत.
या येऊ शकतात अडचणी
जमिनी लगत, भूमीगत टाकी तयार केल्यास जुन्या इमारतींना धोका आहे. एकाच साठवण टाकीतून पाण्याचे असमान वितरण आणि वापर झाल्याने वाद होण्याची शक्यता आहे. नवीन टाकीच्या बांधकाम खर्चाची जबाबदारी कोणाची राहील, यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. संयुक्तिक नळ संयोजनची पाणीपट्टी भरण्यास अपार्टमेंटमधील कुणी नकार दिल्यास कोण जबाबदार राहणार, अशा अनेक अडचणी यामुळे येणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाला निर्णय घेण्याची गरज आहे.
मुंबई-पुण्यात सुरुवातीपासूनच एकच कनेक्शन
मुंबई व पुण्यात अनेक वर्षांपासून अपार्टमेंट सिस्टिम आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या महानगरपालिकांनी अनेक वर्षांपूर्वींच अपार्टमेंटधारकांना एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय आजही कायम आहे. जुन्या अपार्टमेंटमध्येदेखील सम किंवा टाक्या तयार केल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अपार्टमेंटला एकच कनेक्शन आहे. मात्र, ज्या चाळी आहेत, त्या ठिकाणी स्वतंत्र कनेक्शन देण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहरात काही वर्षांपासून अपार्टमेंट संस्कृती रुजू लागली आहे. नव्याने बांधकाम झालेल्या अपार्टमेंटमध्येच सम किंवा टाक्या तयार करण्यात येत आहेत. मात्र, जुने बांधकाम असलेल्यांना हे शक्यच होणार नाही.
मनपाची भूमिका स्पष्टच नाही
मनपा प्रशासनाची अमृत योजनेच्या कामासोबतच त्यानंतरच्या कामांबाबतदेखील भूमिका स्पष्ट नाही. योजना पूर्ण झाल्यानंतर वॉटर मीटरची गरज निर्माण होईल याबाबत मनपाने कोणतेही नियोजन केले नव्हते. जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनपाला जाग आली. त्यामुळे मनपाने आता कुठे वॉटर मीटरच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. तसेच स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा व भाजपचे नगरसेवक सचिन पाटील यांनी अपार्टमेंटबाबतचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनपाला याबाबतची जाग आली. त्यामुळे मनपा प्रशासनाची वॉटर मीटर असो वा अपार्टमेंटला कनेक्शन देण्याचा विषय असो, सर्व प्रकरणात मनपाची भूमिका स्पष्टच झालेली नाही.