जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मंगळवारी (दि.५) जळगाव शहरातील सागर पार्कवर जाहीर सभा होणार आहे. दुपारी दीड वाजता सभेची वेळ असून, त्यापूर्वी ते महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. पवार यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी यासाठी नियोजन केले जात आहे. सागर पार्कवर भव्य मंडप उभारण्यात आला असून, ३० हजार जण उपस्थित राहतील असा दावा केला जात आहे.
खासदार पवार यांचा मिनिट टू मिनिट दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ते मुंबईहून सकाळी ९:५० वाजता जळगाव विमानतळावर येणार आहेत. तेथून १० वाजता जळगाव शहरात येण्यासाठी निघतील. १० : १५ ते १० : ३० दरम्यान मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ हा जैन हिल्स या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला आहे.
दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील. सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात असून, विविध भागात दौरे, जनतेशी संवाद आणि सभा घेत आहेत. वातावरण निर्मितीसाठी पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
पक्षाचे एकमेव आमदार अनिल पाटील हे पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात गेले. मात्र, बाकीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी खासदार शरद पवार यांच्या सोबतच राहिले आहेत. आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी म्हणून मंगळवारच्या सभेत कोणाकोणाचे पक्षप्रवेश होतील याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.