भुसावळ : मध्यप्रदेशातून औरंगाबादकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने यात गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना महादेव तांडा येथे शनिवार रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. अपघातासमयी मदत करण्या ऐवजी या घटनेचा ग्रामस्थांनी गैरफायदा घेत ट्रकमधील गव्हाचे पोती लुटून नेल्याचा अमानवीय प्रकार यावेळी घडला.मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील प्रधान या गावातून गहू भरून तो औरंगाबाद मधील अंजली गावात ट्रकने (एम. पी. १२, एच. ओ. १९२) नेला जात असताना हा ट्रक भुसावळ ते जामनेर दरम्यान, असलेल्या महादेवतांडा येथे आला असता, अचानक ट्रकचे स्टार्टर गरम होऊन जळाल्याचा वास येऊ लागला. यावेळी चालकाच्या सांगण्यावरून क्लीनरने पाहिले असता याला आग लागल्याचे दिसून आले. त्यावर सोबत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी टाकले असता आग आणखीच भडकली. तर आजुबाजुच्या काही नागरिकांनी येऊन माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीच भडका घेतला.दरम्यान ट्रक रस्त्याच्या मधोमध पेटल्याने भुसावळ ते जामनेर मार्गावर दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास यश आले. यानंतर काही स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला बांधून ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.गहू नेण्यासाठी क्लिनरला केली मारहाणगव्हाच्या ट्रकला आग लागल्याची वार्ता शेजारील गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लीनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला. तर चालकाने येथून पळून जात जवळच असलेल्या पोलिस चौकीमध्ये जाऊन आपला बचाव केला. यामध्ये १८ टन (२८५ पोते) गहू होता असे ट्रक चालक शेख फिराज शेख शहा याने सांगितले.
पेटलेल्या ट्रकमधून गव्हाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 9:29 PM