विजयकुमार सैतवाल
जळगाव - जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी होत असली तरी गव्हाची आवकही वाढल्याने गव्हाचे भाव स्थिर आहे. दुसरीकडे मात्र सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने इतर डाळी स्थिर असल्या तरी मुगाच्या डाळीत आठवडाभरात प्रती क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात स्थिर असलेली मुगाच्या डाळीत या आठवड्यात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी असली तरी त्यांचेही भाव स्थिर असल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध आल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ७३०० ते ७७०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीत गेल्या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाली होती. या आठवड्यात या डाळीचे भाव स्थिर आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे तसेच तूरडाळीचेदेखील भाव ७८०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.गव्हाचे भाव स्थिरअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे तीन आठवड्यांपासून गव्हाला मागणी वाढल्याने तीन आठवड्यांपूर्वी गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. मात्र गव्हाची आवक चांगली असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहे. दोन आठवड्यांपूर्वी २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव अद्यापही याच भावावर स्थिर आहे. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३६०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. यात सुगंधी मसुरी २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल, चिनोर ३ हजार रुपये प्रती क्विंटल, कालीमूछ ४ हजार रुपये प्रती क्विंटल, लचकारी कोलम ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल, आंबेमोहर ५ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल, बासमती ९०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत.