सुनील पाटील
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेली आहे. कुराडे यांचा स्थगितीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नवीन नियुक्तीच्या ठिकाणी ते हजर होणार आहेत. सहा महिने आधीच हे आदेश निघाले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या खुर्चीवर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यासाठी अधिका-यांनी ‘टेंडर’ भरण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. खरे तर कार्यक्षमतेच्या बळावर या महत्वाच्या नियुक्त्या होणे अपेक्षित आहे, मात्र कार्यक्षमता हे कारण आता दुय्यम झाले आहे. टेंडर व नेत्यांची मर्जी या दोन बाबींनाच प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे या पदावर येणारा अधिकारी प्रामाणिकपणे आपल्या पदाला न्याय देईलच, याची शाश्वती नाही. पैसा व नेत्यांची मर्जी सांभाळणे यालाच प्राधान्य दिले जाते.
जिल्हा पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद अतिशय महत्वाचे मानले जाते. जिल्ह्यात दोन अपर पोलीस अधीक्षक आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विभागण्यात आले आहे. तसेच उपअधीक्षक आठ आहेत. त्यांचेही कार्यक्षेत्र उपविभातील पोलीस स्टेशनपुरता मर्यादित आहे. दोन्ही वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र मात्र संपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे पोलीस अधीक्षकानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेच कार्यक्षेत्र मोठे आहे. त्याशिवाय कार्यकारी दंडाधिका-यांचाही दर्जा असल्याने या पदाला अधिक महत्व आहे.म्हणून या पदासाठी मोठा घोडेबाजार होतो. कुराडे यांना पदभार सोडायला अजून सहा महिन्याचा कालावधी बाकी असला तरी काही अधिका-यांनी आतापासूनच फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे.