जळगाव : कोरोनाच्या संकटात अडकलेल्या उद्योगांची धडधड पुन्हा सुरू झाली असून जळगावातील जवळपास ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक मजुरांच्या मदतीने उत्पादनही सुरू होऊन येथील चटईची परदेशवारी पुन्हा सुरू झाली आहे.कोरोनाचा जगभर परिणाम होऊन उद्योग क्षेत्रालाही याची झळ बसली. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद करण्याचे आदेश निघाले आणि सर्व उद्योजकांनी आदेशाचे पालन करीत उत्पादन बंद ठेवले. त्यात जळगावातील बहुतांश उद्योग कामगारांवर अवलंबून (लेबर बेस) असल्याने कामगारांनाही त्याचा फटका बसला. सोबतच परप्रांतातील मजूर गावी गेल्याने याविषयी चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली.स्थानिक मजुरांची उपलब्धतामजूर गावी गेल्याची चिंता व्यक्त केली जात असतानाच जळगावातील उद्योग आता स्थानिक मजुरांसह सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात उद्योगांना परवानगी घेण्याविषयी सुचित करण्यात आल्याने अनेक उद्योजकांनी तशी परवानगी घेत मजूर उपलब्धता नसताना उद्योग सुरू करण्याचे धाडस केले. यात त्यांचे हे धाडस यशस्वीही ठरले व उत्पादन भरभराटीस येऊ लागले. यात सध्या जवळपास ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये चटई, पाईप, डाळ, आॅईल, खाद्य पदार्थ उत्पादन कंपन्या सुरू झाल्या आहेत.चटईची परदेशवारी सुरूजळगावातील चटई उद्योग मोठा असून येथील चटईला आखाती देशासह वेगवेगळ््या देशात मागणी असते. यावर परिणाम झाला होता. मात्र आता उद्योग सुरू झाल्यानंतर चटईची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे केवळ उत्पादन सुरू झाले असे नाही तर उत्पादीत मालाला मागणीही सुरू झाली आहे.उद्योजकांकडून सुरक्षेबाबत दक्षताकोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत उद्योजकांकडून दक्षता घेतली जात आहे. यात स्वत:सह कामगारांच्या आरोग्याच्या काळजीसाठी सॅनिटायझेशन, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याविषयी सतर्कता बाळगली जात आहे.जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग सुरू झाल्याने सर्वांचा रोजगारही पुन्हा सुरू झाला आहे. स्थानिक मजूर उपलब्ध होऊन उद्योगांसंदर्भातील हा महत्त्वाचा प्रश्नही राहिलेला नाही. सोबतच उद्योगांसाठी चांगले धोरण राबविले जात आहे. काही अडचणी आल्यास संघटनेच्या माध्यमातून त्या सरकारकडे मांडल्या जातील.- रजनीकांत कोठारी, संस्थापक अध्यक्ष, ‘जिंदा’जळगावातील उद्योग सुरू होऊन येथे उत्पादनही सुरू झाले आहे. तसेच त्यांना मागणीही असल्याने मालाची वाहतूक होत आहे.- किशोर ढाके, अध्यक्ष, लघु उद्योग भारती.स्थानिक मजूर उपलब्ध असल्याने मजुरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे उद्योग सुरू होण्यास काही अडचणी येत नसल्याचे सुखद चित्र आहे.- किरण राणे, उपाध्यक्ष, ‘जिंदा’जळगावातील चटई, पाईप, डाळ, खाद्य पदार्थांसह सर्वच प्रकारचे उद्योग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसंदर्भात उद्योजकांकडून दक्षता घेतली जात आहे.-सचिन चोरडिया,सचिव ‘जिंदा’
उद्योगांची चाके पुन्हा फिरू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:17 PM