लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात जवळपास १८०० उद्योग आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या काळात फक्त ५०० ते ६०० उद्योग सुरू असल्याने उद्योगांची चाके मंदावली आहे. औद्योगिक वसाहतीत असलेला चटई उद्योग तर कोलमडून पडण्याच्या स्थितीवर पोहचला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबतच उद्योग आणि व्यवसायांवर निर्बंधदेखील घातले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा, त्यासाठी लागणारी उत्पादने आणि निर्यातीचे बंधन असलेल्या उद्योगांना मर्यादा घालून सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात असलेल्या १८०० उद्योगांपैकी फक्त ५०० ते ६०० उद्योग सुरू राहू शकतात.
कडक निर्बंधांचे आदेश आल्यावर परप्रांतातील कामगारांनी पुन्हा एकदा गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला मशिन ऑपरेटरची अडचण भासणार असल्याचे समोर आले आहे.
उद्योजकही संभ्रमात
काय सुरू आहे. आणि काय बंद याबाबत शुक्रवारपर्यंत उद्योजकही संभ्रमात होते. तसेच उद्योजकांना स्वयंघोषणा पत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बाजारातील दुकाने आणि पुरवठादारांची कार्यालये बंद असल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
व्यापार बंदनेही वाढल्या अडचणी
३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.त्यामुळे उत्पादन करूनदेखील ते विकायचे कुठे? असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. या आधीच तयार केलेला माल बाजारात पाठवणे निर्बंधांमुळे कठीण झाले आहे.
जळगाव शहरात चटई, दालमिल, प्लॅस्टिक प्रक्रिया उद्योग यासोबतच मोठे कापड कारखाने आणि इतर अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. त्यात दालमिल आणि अन्नप्रक्रिया उद्योग सुरू आहेत. प्लॅस्टिकमध्येदेखील कृषीपूरक उत्पादने सुरू आहेत. मात्र चटई आणि इतर प्लॅस्टिकच्या वस्तू बनवणारे सर्व कारखाने बंद ठेवावे लागत आहेत.
कोट - सध्या उद्योजक अडचणीतून जात आहे. उत्पादन बंद करावे लागत आहे. या निर्बंधाच्या काळात उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता उद्योग सुरू ठेवण्यासाठी स्वयंघोषणा पत्र द्यावे लागत आहे.
- किशोर ढाके, लघुउद्योग भारती