मुंबई/जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, दोन्ही गटातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. शिवाय शरद पवार हेच आमचे मार्गदर्शक आणि दैवत असल्याचं अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येतं. मात्र, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गटावर टीका करताना सावध भूमिका घेतात. शिवसेनेतील बंडानंतर ५० खोके एकदम ओक्के म्हणणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता शांत आहेत. त्यावरुन, मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० आमदारांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके.. असे म्हणत शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका केली. विशेष म्हणजे विधिमंडळातही ही घोषणा लोकप्रिय झाली होती. मात्र, अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून होणारी ती टीका बंद झाली. यावरुन आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला.
आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा, हेच राष्ट्रवादीवाले बोलत होते, ५० खोके एकदम ओक्के. पण, आता अजित पवार आले की ह्यांची तोंड उघडना गेली, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या देवकर यांच्यावर टीका केली. तसेच, अजित पवारांचा सत्कार करणारेही तुम्ही, शरद पवार झिंदाबाद म्हणणारेही तुम्हीच आणि विरोध करायलाही तुम्हीच. मग, तुम्ही अगोदर अजित दादांचे की शरद पवारांचे हे तरी पहिलं सिद्ध करा, असे म्हणत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, हे लोकं स्टेबल नाहीत, आम्ही स्टेबल लोकं आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.