ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाइनची कामे करणाऱ्यांची विनवणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महत्त्वाची मानली जाणारी नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्याकरिता आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली आहे. यंदा ऑनलाइनची कामे करणाऱ्यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून संबंधितांना त्यांची चांगलीच विनवणी करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यास २३ तारखेपासून सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक सुमारे १४ ते १५ प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करताना संबंधितांच्या चांगलेच नाकीनऊ आले आहेत. नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरण्यासह राष्ट्रीयीकृत बँकेचे स्वतंत्र खाते असण्याची अट यावेळी घालण्यात आली आहे. याशिवाय सन २००१ नंतर तीन अपत्य नसल्याचे व शौचालयाचा वापर करीत असल्याचे घोषणापत्र, वयाचा व जातीचा दाखला, ग्रामपंचायतीचा ठेकेदार व थकबाकीदार नसल्याचे पत्र, मतदार यादीत नाव असल्याचा सक्षम पुरावा आदी बरीच कागदपत्रे नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी प्रयत्नांची पराकाष्ठासुद्धा केली आहे. या सर्व धावपळीत विशेषतः बँक खाते उघडण्याची वेळखाऊ प्रक्रिया सर्वांची अडचण वाढविताना दिसत आहे. कारण, ग्रामीण भागात आधीच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कमी आहेत. त्यात तिथे गेल्यानंतर एकाच दिवसात खाते उघडून मिळत नसल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ताटकळावे लागले आहे. पुढे नाताळ, चौथा शनिवार आणि रविवार, अशा सलग सुट्या असल्यामुळे वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या संभाव्य उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या प्रयत्नांवर त्यामुळे पाणी पडताना दिसत आहे.