लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत सत्ता असताना शिवाजीनगर भागातील केशर बाग परिसरातील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी आमदार निधीतून १० लाखांचा निधी दिला होता. मात्र, महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे आमदार भोळे यांनी निविदा प्रक्रिया झालेले काम थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला असल्याचा आरोप भाजपचे बंडखोर उमेदवार ॲड. दिलीप पोकळे यांनी केला आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश भोळे यांनी ९ लाख ९९ हजार रुपयांचा आमदार निधीतून शिवाजीनगर भागातील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी निधी दिला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, मनपा आयुक्त, नगररचना विभागाची मंजुरी घेऊन, निविदा प्रक्रिया राबवून, केवळ कार्यादेश देण्याची प्रक्रिया करून काम सुरु करण्याची तयारी असताना आमदार भोळे यांनी हे काम थांबविण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केल्याचा आरोप ॲड. पोकळे यांनी केला. तसेच आमदार भोळे यांनी याबाबत हे काम थांबविण्यासाठी निविदा प्रक्रियेत गट नंबरची नोंद नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, ही निविदा प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली असून, यामध्ये सीटी सर्व्हेचा स्पष्टपणे उल्लेख असतानाही आमदार भोळे यांनी मुद्दामहून हे काम थांबविले असल्याचा आरोप ॲड. पोकळे यांनी केला आहे. शिवाजीनगर भागातील नागरिकांनीदेखील आमदार भोळे यांना मतदान केले आहे. मात्र, केवळ बदल्याचे राजकारण करून, हा निधी थांबविण्याचा खटाटोप आमदार भोळे यांचा असल्याचा आरोप ॲड. पोकळे यांनी केला आहे.