शेतकरी हतबल : पुलाअभावी पाण्यातून ट्यूबवर ठेवून न्यावा लागतोय शेतीमाल.
दापोरा. ता. जळगाव : दापोरा- लमांजन रस्त्यावरील कुरखून नाल्यावर दोन वर्षांपासून पुलाचे काम मंजूर होऊन लमांजन रस्त्याचेदेखील काम मंजूर झाले आहे. मात्र दोन वर्षे उलटूनही ना रस्त्याचे, ना पुलाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चक्क पाण्यातून केळीचा माल न्यावा लागत असून, दापोरा शिवारातून लमांजनकडे आपला जीव धोक्यात टाकून पाणी पार करून जावे लागत आहे.
दापोरा-लमांजन रस्त्यावरील कुरखून नाल्यावरील पुलाचे काम अभिषेक कन्स्ट्रक्शन्स जळगाव यांनी घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाच्या फाउंडेशनसाठी रस्त्यात पाया खोदण्यात आला. मात्र दापोरा बंधाऱ्याच्या पाण्यामुळे कोणतेच काम झाले नाही. मात्र रस्त्यावर मोठे खड्डे खोदले गेल्याने त्यात पाणी साचले आहे.
शेतातील केळीची कापणी होईना
लमांजन रस्त्याकडे जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळीची कापणी होत नसल्यामुळे शेतात केळी पिकून आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यात व्यापारीदेखील पाण्यातून आलेला माल घेण्यास तयार नाही. काही शेतकरी कवडीमोल भावात माल विक्री करीत आहेत.
तात्पुरत्या स्वरुपात व्हावा पूल
दापोरा तसेच पलीकडील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बाजूला पडलेले पाइप टाकून रस्ता व्हावा जेणेकरून, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबेल.
कोट-
कुरखून नाल्यात रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याची पातळी समजत नसल्याने माझ्यासह अनेक शेतकऱ्यांचे केळीचे मालाची काढणी न झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे नेहमीचा प्रवास करणे कठीण झाले आहे. - सुपडू कृष्णा वरपे, शेतकरी, दापोरा
फोटो कॅप्शन-
पुलाचे काम रखडल्याने शेतकऱ्यांची कसरत... दापोरा- लमांजन रस्त्यावरील कुरखून नाल्यावर दोन वर्षांपासून पुलाचे काम मंजूर होऊन लमांजन रस्त्याचेदेखील काम मंजूर झाले आहे. मात्र दोन वर्षे उलटूनही ना रस्त्याचे, ना पुलाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चक्क पाण्यातून केळीचा माल न्यावा लागत आहे. नाल्यावरील पाण्यातून अशाप्रकारे ट्यूबवर केळीचे घड ठेवून नेताना शेतकरी.