लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -मनपातील सत्ताधाऱ्यांकडून आतापर्यंत केवळ कोटींचे उड्डाणे केली जात आहेत. मात्र, कोणत्याही निधीचे नियोजन देखील होत नसताना, दुसऱ्या निधीतील कामांची घोषणा करून त्याबाबतचे ठराव केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी शहरातील नवीन रस्त्यांचा कामासाठी ४५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा ठराव केला होता. या निधीतून होणाऱ्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असतानाच ते काम रद्द करुन नव्या कामाचे नियोजन सुरु केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचा या भूमिकेमुळे केवळ कोटींची उड्डाणे दाखविली जात असून, प्रत्यक्ष काम केव्हा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पुर्वी केलेल्या ४५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द करून, त्यात २३ कोटींची भर टाकत एकूण ६८ कोटी रुपयांचा कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे आधी ज्या निधीवर मनपा बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु होते. ते काम पुन्हा थांबले आहे. तसेच आता पुन्हा नव्याने ६८ कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमके कोणते कामे करायची आहेत हे अजूनही सत्ताधाऱ्यांना समजलेले दिसून येत नाही.
रस्त्यांचा प्रश्नावर कचाटीत सापडल्यानंतर कोटींची घोषणा
सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केवळ कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली असून, काम मात्र शुन्य केले आहे. रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर शासनाकडून मिळालेल्या १०० कोटींचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले. हा निधी आला मात्र वर्षभर नियोजन करता आले नाही. या निधीपैकी ५० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली मात्र त्यात ही आठ कोटींची प्रस्ताव चुकीचे पाठविल्याने ते अंदाजपत्रक शासनाने रद्द केले. अनेक महिने निविदा प्रक्रिया काढली नाही, त्यात राज्यात सत्तांतरानंतर या निधीवर स्थगिती आली. पावसाळ्यात रस्त्यांचा प्रश्नावर नागरिकांकडून संताप व्यक्त होवू लागल्यानंतर पुन्हा ३० कोटींच्या रस्त्यांचे नियोजन केले. मात्र, त्यातुनही कामाला सुरुवात केली नाही.
आता पुन्हा ६८ कोटी, पुढील महिन्यात १०० कोटींचे नियोजन
सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत पुन्हा ६८ कोटींच्या कामातून होणाऱ्या कामांचा ठराव केला आहे. तसेच एप्रिल महिन्यात पुन्हा १०० कोटींची तरतूद करून एकूण १७० कोटींच्या मनपा फंडातून रस्त्यांचे कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र, ही घोषणा केवळ घोषणाच ठरू नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्यातच मनपा फंडातून कोट्यवधीच्या निधीतील कामांची घोषणा केली जात असताना, महापालिका हा निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.