- स्टार : 730
लसीकरणाला ब्रेक : लसींचा तुडवडा दूर होण्याकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रारंभ करण्यात आले होते, मात्र राज्यात आवश्यकतेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने या वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले असून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोस असे लसीकरण केले जात आहे. शिवाय या लाटेत तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग गंभीर होत असल्यामुळे आता तरुणांना लस कधी मिळणार अशी चिंता कुटुंबातील ज्येष्ठांना सतावत आहे.
जिल्ह्यात लसीकरणाची १७० पेक्षा अधिक केंद्र असून त्यात शहरात दहा केंद्र आहेत. १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरात स्वाध्याय भवन व मास्टर कॉलनीतील मुलतानी दवाखाना या ठिकाणी या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला स्लॉट काढून ज्यांना केंद्र मिळेल त्यांना लस दिली जात होती. मध्यंतरी केंद्रांवरील गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली व लस उपलब्धतेचे प्रमाण कमी असल्यामुळे शिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस यामुळे अडचणीत आल्यामुळे अखेर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आले होते. त्यानंतर उपलब्ध लसीमध्ये केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस याला प्राधान्य देण्यात आले होते, मात्र कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवण्यात आल्याने ही संख्या आता कमी झाली आहे. दुसरीकडे मात्र कोव्हॅक्सिन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिकांचा दुसरा डोस रखडला. त्यामुळे कोव्हॅक्सिन उपलब्ध होताच केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.
दुसरीकडे या दुसऱ्या लाटेत तरुणांचे गंभीर होण्याचे प्रमाण, शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तरुणांना लस देण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रिया समोर येत असतानाच त्यातच या वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आल्याने त्या कुटुंबातील ज्येष्ठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या वयोगटातील तरुणांना घराबाहेर अधिक पडावे लागत असल्याने त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी अशी मागणी आता समोर येत आहे.
४५ वर्षांवरील नागरिक
पहिला डोस : २६९८५०
दुसरा डोस: ७०८४०
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस: २०७८६
दुसऱ्या लाटेत तरुणांना अधिक बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनाही प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. आमचे लसीकरण झाले, मात्र आता मुलांचे लसीकरण लवकर व्हावे ही अपेक्षा आहे. - शांताराम चौधरी
मुला-मुलीला लस देण्यासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी खूप प्रयत्न केले, मात्र नंबर लागला नाही. आता त्यांचे लसीकरण बंद आहे. आमचे लसीकरण झाले. मात्र, त्यांचे बाकी आहे त्यामुळे त्यांची चिंता वाटते. त्यांचे लसीकरण लवकर व्हावे शासनाने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
-शैलेश दुबे
========
१८ ते ४४ या वयोगटातील तरुण सर्वाधिक बाहेर जात असतात, त्यामुळे त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांमध्येच कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात आहे, शिवाय त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्यांचे लसीकरण व्हावे, ही आता चिंता आहे. शासन ते कधी सुरू करणार याकडे लक्ष आहे.
- गोपाळ पाटील