वार्तापत्र
महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच की प्रचारादरम्यान ज्या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलवण्याची भाषा केली होती त्याच भाषेला जळगावकर भाळले, विशेष म्हणजे शहरात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु होते. अशा परिस्थितीतही भाजपच्या नेत्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा केली ते ही केवळ वर्षभराच्या आत, मात्र आज भाजपची सत्ता येऊन पुढील महिन्यात अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत. या अडीच वर्षात शहराचा चेहरामोहरा सत्ताधाऱ्यांनी खरच बदलवून दाखविला आहे. आज शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे. ती याआधी इतक्या प्रमाणात उडत नव्हती, मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना दिवसातून पाचवेळा दुकान साफ करावे लागत आहे, ते याआधी कधीही होत नव्हते हे सत्ताधाऱ्यांनी करून दाखविले, शहराचा चेहरामोहराच काय सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचे नाव बदलवून दाखविण्याची किमया केली असून, जळगाव आता धुळगाव म्हणून ओळखले जात आहे. शहरातील रस्ते अजून वर्षभर तरी होण्याची शक्यता नाही, कारण सत्ताधाऱ्यांचे मते शहरात अमृतचे काम सुरु असल्याने नवीन रस्ते होऊ शकत नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या वेळेस देखील अमृतचे काम सुरु होते. शासनाने अमृत दरम्यान रस्ते करू नये असे तेव्हाही म्हटले होतेच. मात्र, आश्वासने व घोषणा करताना शासनाचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांना दिसला नाही. आता शहरातील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. वातावरणात या धुळीमुळे धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे विकार होत असून, धुळीमुळे श्वसनाचे विकार देखील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता तरी सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जळगावकरांसह शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांसाठी देखील आता रस्त्यांची समस्याच महत्वाची वाटत आहे. मात्र, मनपाला मिळालेल्या ४२ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. केले तर त्यात शहराची मुख्य समस्येला बगल देत, रस्त्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद केली तर इतर निधीतून मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल तयार करण्याची तरतुद केली. मोकळ्या जागा जशा कोणी खाऊन जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना अजूनही मुख्य समस्या कळत नाहीत. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी जळगावला धुळगाव केले असून, आता पुढील अडीच वर्षात धुळगावचे जळगाव करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी न केल्यास जळगावकरांचा संताप इव्हीएम मशीनवर निघून सत्ताधाऱ्यांना बेदखल देखील करू शकतात, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मुख्य समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.