जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यामध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, आता या परिसरातील वाहतूक कोंडीला हैराण झाले आहेत़
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले़ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परिणामी, अनेकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटला. अनेक कपडे व भाजीपाला विक्रेत्यांनी महामार्गासह शहरातील रस्त्यांवर आपली लहान-मोठी दुकाने थाटून आपल्या रोजगाराची सोय केली. यामुळे महामार्गावरील रस्त्यावर चांगलेच अतिक्रमण झाले आहे. दुसरीकडे शहरात हातावर मोजण्याइतकेच रस्ते सुस्थितीत आहेत. इतर ठिकाणी खड्डेच-खड्डे बघायला मिळत आहे. असेच काही काशिनाथ चौकात पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर प्रचंड भले मोठे खड्डे झालेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भर चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही कोंडी आजही कायम असून सोमवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा कोंडी झाली होती.
रस्त्याच्या मधोमध खड्डा
काशिनाथ चौकात मधोमध भला मोठा खड्डा आहे़ त्या खड्ड्यामुळे बरीच वाहने संथ गतीने जातात तर काही वाहने त्या अडकतात़ त्यामुळे लहान-मोठे अपघात त्या ठिकाणी होत आहे. त्यातच मेहरूण व गुरांच्या बाजारकडे जाणा-या रस्त्यावर वळण घेण्यासाठी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक गेल्यास काही क्षणातच कोंडी होते़ त्यात बेशिस्त दुचाकीस्वारांकडून त्यात अधिक भर पाडली जाते.
पर्यायी रस्त्याचा शोध...
प्रचंड धूळ..., मोठमोठे खड्डे...आणि त्यात नियमित होणारी वाहतुकीच्या कोंडीने परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत़ घरी जाण्यासाठी अनेकांनी पर्यायी रस्ताचा शोध घेतला आहे़ वेळ लागत असला तरी लांबवरचा रस्त्याचा घरी जाण्यासाठी वापर करीत असल्याचे एका वाहनधारकाने सांगितले. तर काशिनाथ चौकातून मेहरूणकडे जाण्यासाठी चौकातून वळण न घेता, शंभर मीटर अंतरावर असलेल्या मेहरूणकडे जाणा-या दुस-या रस्त्यावरून मोठ्या वाहनांना वळण घ्यावे लागत आहे. दरम्यान, ही कोंडी लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.