देशभरात महाराष्ट्र असे राज्य आहे की, येथे परिवर्तनवादी विचारसरणी मांडणारे आणि संघर्ष करणारे संत व समाजसुधारक जन्माला आलेले आहेत. त्यांच्या कार्याने जगभर महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य अशी झाली आहे. मात्र असे असूनही अनेक कुप्रथा राज्यात सुरू आहे हे ऐकून मन सुन्न होते. सहा वर्षांपूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होते, कारण त्यांचे विचार परिवर्तनवादी होते आणि त्यांनी धर्मांधता पसरविणाऱ्या सनातनी विचारांना आव्हान दिले होते. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांना संपविले जाते. ही आजची महाराष्ट्राची अस्वस्थता आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ.दाभोलकर यांच्या हत्येनंतर झालेला जादूटोणाविरोधी कायदा आणि २०१७ साली पारित झालेला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे दोन महत्वाचे कायदे राज्य शासनाकडून पारित करून घेण्यासाठी संघर्ष केला. डॉ.दाभोलकर असे म्हणाले होते की, जात ही मोठी अंधश्रद्धा आहे. खरे तर जात नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र आमच्या क्षमता व मर्यादा यांचा विचार करता जातीचे अग्रदल असणाºया जातपंचायत आम्ही नष्ट करू शकलो तरी जातीला हादरे बसतील. होय, जातपंचायत हा प्रकार राज्यात अजूनही आहे, आणि तो जाचक स्वरुपात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३० वर्षांपासून राज्यभरात व्यापक समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. राज्यभरात जातपंचायतींच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र अंनिस गेली सात वर्षे संघर्ष करीत आहे. अंनिसने साधलेल्या सुसंवादातून आतापर्यंत १५ जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. आतापर्यंत जातपंचायतींनी छळलेली आणि बहिष्कृत केलेली पाचशेहून अधिक प्रकरणे गेल्या सात वर्षात अंनिसने हाताळली.काही समाजात पंचांना देवाचा अवतार समजला जातो किंबहुना तसा गैरसमज जाणीवपूर्वक करून दिला जातो. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम समजला जातो. पंच आपल्या जातीचे जीवनमान नियंत्रित करतात. जन्मापासून ते मरणापर्यंच्या महत्त्वाच्या घटनांवर ते नियंत्रण ठेवतात. ते कायदे बनवतात, स्वत: न्यायनिवाडे करतात व स्वत:च शिक्षा करतात. त्यांचे न्यायनिवाडे हे अंधश्रद्धेवर आधारित असतात. शोषक असतात. जातपंचायतच्या शिक्षा या अघोरी व अमानुष असतात. शारीरिक किंवा दंडाच्या स्वरुपात शिक्षा करून तर कधी समाजबांधवाचा जीव घेऊन किंवा मानसिक त्रास देत जीव देण्याची मानसिकता तयार करून पंच समाजबांधवांवर वचक निर्माण करतात. दंडाची बेहिशेबी रक्कम पंच स्वत: साठी वापरतात. शिक्षा करताना ते अनेकदा जात बहिष्कृत करण्याचे सर्वात मोठे शस्त्र उगारतात. अशा वाळीत टाकलेल्या व्यक्तींशी इतर जातबांधवांनी संबंध तोडण्याचा फतवा निघतो.सामाजिक बहिष्कार कायदा अंमलबजावणी होण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नेमणे आवश्यक असून जातपंचायतींच्या नोंदी ठेवल्या जाणे आवश्यक आहे. सोबत पोलीस दलानेदेखील अशा जातपंचायतींची माहिती मिळाल्यास तेथे कारवाई आणि कारवाईदेखील करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक बळी जातील हे खेदाने सांगावेसे वाटते. जातपंचायती बरखास्त होण्यासाठी स्वत: जातपंचायतींनी पुढे येणे गरजेचे असून नागरिकांनी देखील जातपंचायतीविषयी तक्रारी देणे महत्वाचे आहे.- विश्वजीत चौधरी, जळगाव
जातपंचायतींचे शोषक निवाडे थांबतील तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:33 AM