स्टार ८५२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे दुसऱ्या अनलॉकनंतर अमृतसर एक्स्प्रेस, खान्देश एक्स्प्रेस, नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस आदी गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्या तरी, हुतात्मा एक्स्प्रेस,शालिमार एक्स्प्रेस व हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली हुतात्मा एक्स्प्रेसही अद्याप सुरू न करण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस कधी सुरू होणार ? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. ७ जून पासून शासनाने निर्बंध उठविल्या नंतर सर्व प्रकारच्या बाजारपेठा व उद्योग- व्यवसाय सुरू झाले आहेत. या मध्ये महामंडळातर्फेही पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारच्या अनेक महत्वाच्या गाड्या अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. यामध्ये पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. भुसावळ विभागातून मुख्यतः हुतात्मा एक्स्प्रेस गेल्या वर्षापासून बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने इतर गाड्या सुरू केल्या असतांना,भुसावळ विभागातील इतर महत्वाच्या गाड्या का सुरू केलेल्या नाहीत, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
- हावडा एक्स्प्रेस
- कुशीनगर एक्स्प्रेस
- महाराष्ट्र एक्स्प्रेस
- झेलम एक्स्प्रेस
- काशी एक्स्प्रेस
- राजधानी एक्स्प्रेस
- कामायनी एक्स्प्रेस
इन्फो :
या गाड्या कधी सुरू होणार
- हुतात्मा एक्स्प्रेस
- शालिमार एक्स्प्रेस
- हावडा- सुपरफास्ट एक्स्प्रेस
इन्फो :
कोरोना संसर्गामुळेच पॅसेंजर अद्यापही बंदच
-रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने बहुतांश रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असून, कोरोनाचे कारण सांगून पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
- पॅसेंजर गाड्यांना प्रवाशांची गर्दी जास्त राहत असल्याने, यातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे या गाड्या सुरू करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात आले.
- रेल्वे बोर्डाकडून जो पर्यंत पॅसेंजर सुरू करण्याचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत भुसावळ विभागातून एकही पॅसेंजर सुरू करण्यात येणार नसल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
प्रवासी म्हणतात..
रेल्वे प्रशासनाने इतर गाड्या सुरू केल्या असल्या तरी, त्या गाड्यांनाही गर्दी आहे. मग पॅसेंजर सुरू करायला काय हरकत आहे. एक्स्प्रेस मधून कोरोना होतो आणि पॅसेंजर मधून कोरोना होत नाही का? सध्या रेल्वे प्रशासनाचे धोरण काय सुरू आहे, हे समजत नाही.
संजय पाटील, प्रवासी
रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस, शालीमार व पॅसेंजर गाड्या सुरू न केल्याने सर्व सामान्य प्रवासी व चाकर मान्यांचे चांगलेच हाल होत आहे. त्यात रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्यांचे वेल्हापत्रक बदलविल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांनी आवाज उठविणे गरजेचे आहे.
रवींद्र येवले, प्रवासी