वळणा-वळणांचा घाट रस्ता. तिरकी टोपी घातलेला तरणाबांड नायक उघडय़ा जीपमधे मित्राबरोबर ‘मेरे सपनों की रानी.. हे गाणे म्हणतोय. नायिका इटुकल्या पिटुकल्या खेळण्यांच्या आगगाडीत बसून त्याच्याकडे बघत आपली उगीचच लाजतेय. आठवलं गाणं आणि तो सिनेमा? पर्यटकांना आकर्षित करणारी ही रोमॅंटिक लहानशी आगगाडी मूळात व्यापार वाढवण्यासाठी विकसित केली गेली. ‘दाजिर्लिंग हिमालयन रेल्वे’ सुरू झाली 1881 साली. त्याआधी कलकत्त्याहून दार्जिलिंगर्पयतचा प्रवास लांबलचक आणि कष्टप्रद होता. आधी साहिबगंजपयर्र्त रेल्वे आणि नंतर बोटीने गंगा पार करणे आणि त्यानंतर टांगा किंवा बैलगाडी किंवा पालखीने घाट चढून दार्जिलिंगला पोहोचायचे! ज्या प्रवासाला पूर्वी अनेक आठवडे लागायचे तो आता 23 तासात होऊ लागला. अर्थात चहाची वाहतूक करणे सोपे झाले तसेच मजुरांची आणि मालाची ने आण. नाही तर पूर्वी जो तांदूळ कलकत्त्याला 98 रुपये टन या दराने मिळायचा तो दार्जिलिंगला 283 रुपयांना. दार्जिलिंग चहाचा व्यापार तेजीत आला तो ह्या रेल्वेमुळे. अर्थात चहा जगभर इतका लोकप्रिय होता की चक्क चीनहून रशियाला तो पोहोचायचा. उंटांचे ह्यकांरवा संथपणे हा चहा रशियाला पोहोचवायचे ते दीड वर्षात. 1618 साली रशियाच्या झार सम्राटाला मंगोलियन आल्तीन खानने 250 पौंड चहा भेट दिला. दुर्मीळ, महाग चहा लागलीच रशियन उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय झाला. चीन व्यापारासाठी पुढे सरसावला. चीनहून उंटावरून नेलेला चहा 11 हजार मैल प्रवास करून, दीड वर्षानी रशियाला पोहोचायचा. रोज सहा हजार उंट रशियाला पोहोचायचे आणि प्रत्येक उंटावर 600 पौंड चहा असायचा! 1903 साली ट्रान्स सायबेरीयन रेल्वे सुरू झाली आणि आता चहा पोहोचू लागला सात दिवसात! सर्वसामान्य भारतीय जनतेपयर्ंत चहा पोहोचला तो पहिल्या महायुद्धानंतर. तोपयर्र्त तो भारतातले युरोपियन आणि उच्चभ्रू भारतीयांना फक्त परिचित होता. महायुद्धानंतर चहा व्यापार कमालीचा थंडावला. आता ब्रिटिशाना अचानक साक्षात्कार झाला की भारतातच प्रचंड ग्राहक निर्माण होऊ शकतं. झालं! आता ब्रिटिशांनी चहा खेडोपाडी पोहोचवायला सुरुवात केली. त्यासाठी चहाची पाकिटे तयार झाली. गावोगावचे बाजार आणि गल्लीबोळात चहा कसा करायचा याची प्रात्यक्षिकं होऊ लागली. पडदा घेणा:या बायकांपयर्ंत पोहोचायला शिकलेल्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुले यांना नोकरी मिळू लागली. चहाची ओळख ‘कष्टक:यांचा मित्र’ अशी करून देण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तोपयर्ंत फक्त सिंग फो जमातीला चहा माहीत होता असे मानले जाते. शिवकाली भट्टाचार्य हे ‘चिरंजीव वनौषधी’चे लेखक मात्र सहमत नाहीत. ते लिहितात की संस्कृतमध्ये चहाची पाच तरी नावे आहेत.. श्यामपर्णी, ेष्मारी, गिरीभित, अतांद्री आणि कमलरस. प्राचीन लोक म्हणे त्याचं ‘फांट’ करून प्यायचे--पाणी गरम असताना त्यात चहापत्ती टाकून घट्ट झाकण लावून ठेवायचे. नंतर गाळून प्यायचे. वेदकालीन ‘सोमरस’ म्हणजेच चहा असाही दावा काहीजण करतात. काही तर लक्ष्मणाला जीवदान देणा:या संजीवनी वनस्पतीशी तिचा संबंध जोडतात. त्यासाठी सबळ पुरावे मात्र पुढे आलेले नाहीत. चीनला मागे टाकत आज जवळजवळ 80 टक्के जागतिक चहा उत्पन्न भारतीय आहे आणि उत्पन्नाच्या 80 टक्के चहा भारतात प्यायला जातो.
मेरे सपनों की रानी कब आयेगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:11 AM