शहरातील बहुतांश कॉलन्यांना रस्त्यांची प्रतीक्षा आहे़ कच्चे आणि मातीचे रस्ते असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना आजही चिखलातून वाट काढावी लागते़ पावसाळ्यात तर घराबाहेर निघणे देखील कठीण होते़ अशा भागांची पाहणी करून त्याठिकाणी रस्त्यांची सुविधा व्हावी, अशी मागणी रहिवाश्यांकडून होत आहे़ सध्या शहरात नवीन कॉलन्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत़ ज्याठिकाणी टेकड्या होत्या़ त्याठिकाणी सुध्दा घरे बांधली गेली़ मात्र, अजूनही या कॉलन्यांना पक्के रस्ते मिळालेले नाहीत़ काहींना तर स्वत:चे वीज मीटर सुध्दा मिळालेले नाही़ वाघनगर, खेडी परिसर, खंडाराव नगर परिसर, पिंप्राळा, शिवाजीनगर हुडको परिसरांमधील काही भागांमध्ये आजही रस्ते झालेले नाही़ त्यामुळे पावसाळ्यात चिखलातून जावे लागते़ इतरवेळी सांडपाणी रस्त्यावर साचले की, पुन्हा चिखल होते़ त्यामुळे या समस्ये पासूनही नागरिक हैराण झाले आहेत़ मागील पावसाळ्यात खेडी परिसरातील एका कॉलनीत चक्क पावसाळ्यात रस्त्यावर मोठ-मोठी खड्डे झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांना सुध्दा शाळेत जाणे अडचणीचे ठरत होते़ तर मालवाहतूक रिक्षा देखील उलटल्याची घटना घडली होती़ अखेर नागरिकांनी स्वत: पैसे गोळा करून तुटलेल्या विटा व खडी आणून खड्डे बुजविले होते़ पिंप्राळा-हुडको रस्त्याचीही प्रचंड दुर्दशा झाली असून या रस्त्याची दुरूस्ती होणे अपेक्षा आहे़ सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे़ ज्या भागांमध्ये रस्ते नाहीत, त्याठिकाणी लवकरात लवकर रस्ते करून पावसाळ्यात होणारी नागरिकांनी गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा आहे़ याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत.- सचिन काटोले, पिंप्राळा.
रस्त्याची दुरुस्ती कधी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:06 PM