लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तरसोद ते फागणे या दरम्यानचा महामार्गाचे चौपदरीकरण हा जिल्हावासीयांसाठी शाप ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही या रस्त्याचे ५० टक्के देखील काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे फागणे ते पाळधी या दरम्यान प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी या ठेकेदाराला संथ गतीने काम केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड देखील ठोठावला होता.
या महामार्गाचे काम संथ गतीने होत असल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी हा प्रश्न लोकसभेत देखील उपस्थित केला होता. हे काम संथ गतीने होत असल्याने या रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे देखील त्यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यावेळी या इंदूरच्या ठेकेदाराला चार कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता.
तरसोद ते फागणे हा टप्पा आहे. हा टप्पा ८७ किमीचा असून त्याची किंमत १०२१
कोटी रुपये आहे. मात्र या कामाला फारसा वेग मिळत नव्हता. या रस्त्यात
बहुतांश ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. फागणे ते पाळधी हा वापरातील महामार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर पाळधी ते तरसोद हा संपूर्ण रस्ता नव्याने बनवला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक नाही. तरीही तेथे काम संथगतीने होत आहे. जेथे पूल बनवायचे आहेत. तेथे पुलाच्या कामांना अजूनही वेग आलेला नाही.
मजुरांचीही अडचण
या रस्त्याच्या कामालाही सध्या मजुरांची अडचण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक निर्बंध असल्याने परप्रांतीय मजूरदेखील गावी परत गेले आहेत. होळीला गावी गेलेले मजूर देखील परत आलेले नाहीत. मजूर नसल्याने या रस्त्याच्या कामाला देखील अडचणी येत असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. देशभरात सुरू असलेल्या सर्वच कामांना आता केंद्र सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कामाला देखील आता जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
आकडेवारी
तरसोद ते फागणे
रस्त्यांचे अंतर ८७.३ किमी
प्रकल्पाची किंमत १०२१ कोटी
काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी २०२२
वाढीव मुदत - सहा महिने
पूर्ण झालेले काम - सुमारे ३५ टक्के