लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या मार्च महिन्यापासून मुलांच्या शाळा बंद आहेत. आता पाचवीपासूनच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी वर्गात जाणे ऐच्छिक करण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही काही विद्यार्थी घरीच आहेत. तर पहिली ते चौथी या प्राथमिक वर्गांमधील विद्यार्थ्यांची शाळा सुरू झालेली नाही. एरवी कधी शाळेतून सुटी मिळते याची वाट पाहणारी मुले आता जवळपास वर्षभर शाळा बुडाल्यानंतर पुन्हा कधी शाळेत जायला मिळतेय याची वाट पाहत आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठवायला पालकांचा नकार आहे.
राज्य सरकारने सुरुवातीला नववी ते बारावी असे वर्ग सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली. महाविद्यालये देखील आता सुरू झाली आहेत. मात्र पहिली ते चौथी या वर्गांना अजूनही सुरुवात झालेली नाही. ही मुले आपल्याला कधी शाळेत जायला मिळेल. याची वाट पाहत आहेत. दिवसभर घरी बसून राहणे, आणि ऑनलाइन जमेल तेवढ्या तासांना उपस्थित राहणे याला विद्यार्थी कंटाळले आहेत.
प्रतिक्रिया
शाळेत जायचे आहे. पण शाळा सुरू झालेली नाही. घराच्या बाहेर खेळायला जायचे म्हटले तर कुणीच घराच्या बाहेर जाऊ देत नाही. शाळेत गेलो तर किमान घराबाहेर तरी जाता येईल. - जिग्नेश बारी, विद्यार्थी
शाळा कधी सुरू होणार? लवकर शाळा सुरू नाही झाली तर घरात किती दिवस बसून रहायचे, बाहेर खेळायला सुद्धा जाता येत नाही. मोठी माणसे घराच्या बाहेर जातात. पण आम्हाला घरातच खेळावे लागते. - अनुष्का अस्वार, विद्यार्थी
शाळा बंद आहे. मोठ्या मुलांना शाळेत जावे लागते. मी घरीच आहे. व्हॉट्स ॲपग्रुपवर अभ्यास येतो. तो केला की बास, परीक्षासुद्धा अशीच व्हॉट्स ॲप ग्रुपवर घ्या - जागृृती महाजन, विद्यार्थी
शाळा सुरू झाली तर किमान घराच्या बाहेर काही वेळ तरी जाता येईल. शाळेच्या ग्राउंडवर जाऊन काही वेळ तरी खेळता येईल. पण सध्या शाळेजवळ देखील जाता येत नाही - संकेत काळे विद्यार्थी
पालक
कोरोना जात नाही. तोपर्यंत शाळा सुरू करू नये, किमान लहान मुलांनी शाळेत यावे, यासाठी सक्ती करू नये. त्यांना बाहेर पाठवणे धोक्याचे आहे. - संदीप पाटील, पालक
कोरोना पुन्हा वाढतोय. त्यामुळे अजून काही महिने तरी या मुलांचे वर्ग ऑनलाइनच घ्यावे, त्यामुळे मुले सुरक्षित तरी राहतील. कारण या वयातील मुलांना कोरोनाचे नियम काय आहेत. देखील कळणार नाही. ते नियम पाळणार नाहीत. - जयेश मालकर, पालक
कोरोनाच्या नियमांचे पालन करून मुलांना घरूनच शिकू द्यावे, ऑनलाइन शिकवणे कठीण आहे. पण जे शक्य होईल. तेवढेच सरकारने करावे. पण मुले घरी असलेली सुरक्षित आहेत. - श्रीकांत फुसे, पालक
मुलांना अजून शाळेत बोलावू नये, कोरोना रुग्ण संख्या अजूनही म्हणावी, तशी कमी झालेली नाही. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याआधी खूप विचार करायला हवा ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध आहेच - नारायण काटोले, पालक
पहिली ते चौथीच्या शाळा - २५७३
विद्यार्थी संख्या - ३१३७९५