लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गासह नागरिकांना बेड, औषधोपचार, इंजेक्शन यांच्यासाठी भटकंती करावी लागत असून अधिकचे पैसे देऊनही इंजेक्शन मिळत नसल्याने जिल्हावासीय धास्तावले आहे. या सैरावैरा झालेल्या जनतेने कोठे जावे, असा सवाल भाजपच्या खासदार व आमदारांनी केला आहे.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने औषधोपचारासाठीही भटकंती करावी लागत आहे. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जनता हैराण झाली आहे. त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करीत असले तरी राज्य पातळीवरून नियोजन नसल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केला.
..... तर लोकप्रतिनिधी घरी बसतील
जिल्ह्यातील स्थिती पाहता जनतेच्या मदतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अधिकाऱ्यांना फोन केले असता ते उर्मटपणे उत्तरे देतात तसेच योग्य सहकार्य करीत नाही, असा आरोप आमदार भोळे यांनी केला. जर प्रशासन सक्षम असेल तर लोकप्रतिनिधी घरी बसतील, काहीही झाले तरी जनतेच्या मदतीला जाणार नाहीत. त्यावेळी प्रशासनाने सर्व जबाबदारी सांभाळावी, असे आमदार भोळे यांनी नमूद केले.
प्रत्येक कोविड सेंटरवर कार्यकर्ता
जनतेला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने व उपचारात अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक कोविड केअर सेंटरवर भाजपचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत व ते नागरिकांना मदत करतील, असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण हेदेखील उपस्थित होते.