लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्वारी खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे अमळनेरात अजूनही गोदामाची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
धरणगाव येथे उभारण्यात आलेले खरेदी केंद्र अमळनेर शेतकी संघामार्फत धरणगाव तालुक्यात मार्केटमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. याठिकाणी आतापर्यंत १९८६ क्विंटल मका खरेदी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ज्वारी २८ क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या ठिकाणी बावन्न शेतकऱ्यांनी मकामोजणीला प्रतिसाद दिलेला आहे. मात्र ज्वारी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. दोन शेतकऱ्यांनी २८ क्विंटल ज्वारी शेतकी संघामार्फत मक्याला आठशे पन्नास रुपये भाव मोजला जात आहे तर ज्वारी सव्वीसशे रुपये क्विंटल दिली जात आहे. मात्र या मोजणी ठिकाणी ज्वारी देण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे.
हे खरेदी केंद्र धरणगाव मार्केट कमिटी याठिकाणी सुरू असून अमळनेर शेतकी संघामार्फत सुरू करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी करून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतही खरेदी सुरू रहाणार आहे.
अमळनेर तालुक्यातील शेतकरी हैराण
अमळनेर : भरड धान्य खरेदी सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीदेखील येथे गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेकजण मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना धान्य विकत असल्याचे लक्षात येत आहे. हमी भाव मिळावा म्हणून पणन महासंघाच्या माध्यमातून शासनाने भरडधान्य खरेदी योजना सुरू केली. ही योजना फक्त २ महिन्यांसाठी आहे. एक महिना उलटून गेला आहे, तरीदेखील शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात आलेली नाही. मात्र मका खरेदी सुरू आहे. यावर गोदाम उपलब्ध नसल्याचं कारण सांगण्यात येत आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुट्या सोडून फक्त २० दिवस खरेदी सुरु राहणार आहे. यातही अजून ज्वारी खरेदी सुरु झालेली नाही. अमळनेर तालुक्यात भरडधान्य खरेदी योजनेत ज्वारी खरेदी झाली नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याचे क्विंटलमागे १ हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. बाजार समितीतील १५ हजार क्विंटल क्षमता असलेले गोदाम शेतकी संघाने मागणी केल्याचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी सांगितले तर याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता तहसीलदार मिलिंद वाघ यांचा भ्रमणध्वनी बंद होता. प्रशासन यात गंभीर नसल्याचे लक्षात येत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक भागात व्यापारीवर्ग शेतकऱ्यांना गाठून तसेच खेडोपाडी जाऊन रोख पैसे देतो, असे सांगत शेतकऱ्यांकडील धान्य विकत घेतले जास असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.