लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जून, जुलै महिन्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लस या व्हेंरिएंटच्या सहा रुग्णांचा या काळात बाहेर जिल्ह्यात प्रवास नसून यातील काही रुग्ण हे जिल्हाअंतर्गतच ते लग्नात गेल्याचे समोर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या सहाही रुग्ण व त्यांच्या जवळच्या तसेच दूरच्या संपर्कांवर विशेष लक्ष असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाभरात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या १३ झाली आहे. दुसरे सहा रुग्ण हे जळगाव शहर २, जामनेर ३ व पारोळा तालुक्यात १ आढळून आला आहे. मात्र, हे सहाही रुग्ण ठणठणीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारीच स्पष्ट केले होते. दरम्यान, ज्या काळात हे रुग्ण आढळून आले आहेत. त्या काळानंतर जिल्हाभरात रुग्णवाढ किंवा मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही.
जून महिन्यातील रुग्ण २३२४, बरे झालेले ७२०१, मृत्यू ३८
जुलै महिन्यातील रुग्ण २९२, बरे झालेले : ८७४, मृत्यू ०५
ऑगस्ट महिन्यातील रुग्ण : ३३, बरे झालेले ८८, मृत्यू ००
जिल्ह्यात ४ नवे कोरोना बाधित
मंगळवारी जिल्हाभरात कोरोनाचे ४ नवीन रुग्ण समोर आले असून ६ रुग्ण ब देखील झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे. यात जळगाव शहरात २ तर अमळनेर शहरात २ बाधित आढळून आले आहेत. हे चारही रुग्ण ॲन्टिजन चाचणीत बाधित आढळून आले आहेत. आरटीपीसीआरच्या ७७३ तपासण्यांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही तर ॲन्टिजनच्या १७२९ अहवालांमध्ये ४ रुग्ण आढळून आले आहेत.