जळगाव : शेतकऱ्यांच्याप्रश्नी आमदार एकनाथ खडसेंनी काळे झेंडे दाखवायचे की पिवळे, हा त्यांचा विषय आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे. त्यात उपेक्षित घटक सहभागी होणार आहे, अशी माहिती देणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली खडसेंशी वैचारिक ‘दुरी’ आहे, मनाची नव्हे, अशा शब्दांत त्यांनी दोघांमधील मतभेदांविषयी भाष्य केले.
मंगळवारी होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जळगाव शहरात येणार आहेत. रविवारी या कार्यक्रमस्थळाची पाहणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आघाडी सरकारचा होता. मात्र, शिंदे सरकार त्याचा ‘इव्हेंट’ करीत असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. तसेच कापसाला रास्तभाव न दिल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला होता.
त्यावर बोलताना पाटील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मागच्या सरकारमध्येही मी होतोच. हा इव्हेंट नाही. उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. खडसेंनी काळे झेंडे दाखवायची की पिवळे, हा त्यांचा विषय आहे. काल आम्ही भुसावळला एका लग्नसोहळ्यात होतो सोबत. आम्ही बोललो. नाष्टाही सोबत घेतला. त्यांना कार्यक्रमाचे आमंत्रणही दिले. त्यांच्यात आणि माझ्यात वैचारिक ‘दुरी’ आहे. मनाची नव्हे, अशा शब्दांत पाटील यांनी भूमिका मांडली.