जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार थांबला असून, आता मतदारांच्या भेटी-गाठी घेवून प्रत्यक्ष प्रचारावर उमेदवारांकडून भर दिला जाणार आहे. दरम्यान, मतांसाठी मतदारांना वेगवेगळी आमीषं दाखविली जात आहेत. एका मतदाराने चक्क उमेदवारांना ३ हजारांचे पाकीट देवून २० रुपयांची कोरी नोट दिली आहे. तसेच विजयी झाल्यानंतर तीच कोरीनोट दाखवून उर्वरीत २ हजार रुपये दिले जाणार आहेत.
बाजार समितीसाठी आता काट्याची लढत झाली आहे. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांकडून मंगळवारपर्यंत पॅनलमधील सर्व उमेदवारांसाठी मतं मागितली जात होती. मात्र, प्रचार थांबल्यानंतरच लागलीच उमेदवारांनी पॅनलला सोडून केवळ स्वत:साठी मतं मागायला सुरुवात केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. मेळावे, बैठकांमधून उमेदवार पॅनलसाठी मतं मागत होते. मात्र, आता उमेदवार मतदारांच्या गावोगावी जावून थेट प्रत्यक्ष भेटी घेवून, केवळ एकाच मताची मागणी करताना दिसून येत आहे.
मतदारांची मात्र चांदी...
बाजार समितीची निवडणूक जेवढी चुरशीची झाली आहे. तेवढाच फायदा मतदारांचा होणार असल्याचे काही मतदारांनी ‘लोकमत’ला सांगितले. पॅनलकडून वेगवेगळी रक्कम मतदारांना देण्यात आली आहे. तर वैयक्तिक उमेदवारांकडून देखील वेगळी रक्कम मतदारांना दिली जात आहे. पॅनलकडून विकाससोसायटी मतदारसंघातील मतदारांना १५ हजार, ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांना ७ हजार रुपये दिले जात आहेत. तर वैयक्तिक मतासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पाकीट मतदारांना दिले जात आहे. त्यामुळे मतदार देखील पॅनलसह वैयक्तिक उमेदवारांकडूनही रक्कम घेत मतांचे आश्वासन देत आहेत.
पैठणीसह ३ हजारांचे पाकीट, विजयी झाल्यानंतर २ हजार
एका उमेदवाराने जळगाव तालुक्यातील कानळदा-भोकर पट्ट्यातील काही गावांमध्ये एका मतासाठी पैठणीसह ३ हजार रुपयांचे पाकीट वाटप केले. तसेच हे पाकीट दिल्यानंतर मतदाराला २० रुपयांची कोरी नोट टोकण म्हणून देण्यात आली आहे. जर बाजार समितीच्या निवडणुकीत संबधित उमेदवार विजयी झाल्यास, टोकण म्हणून देण्यात आलेली २० रुपयांची नोट दाखवून उर्वरीत २ हजार रुपयांची रक्कम मतदारांना दिली जाणार असल्याची नवी स्कीमच उमेदवाराने आणली आहे. उमेदवार मात्र पराभूत झाल्यास उर्वरीत २ हजार रुपये मात्र दिले जाणार नाही, या स्कीमची चर्चा जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरात सुरु आहे.
असे दिली जातेय रक्कम...
विकास सोसायटी मतदार संघ - संपुर्ण पॅनलला मतासाठी १५ हजारग्रामपंचायत मतदारसंघ - संपुर्ण पॅनलला मतासाठी ७ हजारविकास सोसायटी मतदारसंघ - एका सदस्याला मतदान करण्यासाठी ३ ते ५ हजारग्रामपंचायत मतदारसंघ - एका सदस्याला मतदान करण्यासाठी ५ हजार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"