कुसुंबा येथील घटना : कौटुंबिक कारणातून आत्महत्या
जळगाव : बहीण-भाऊ एकाच ठिकाणी काम करीत असताना दुपारी जेवणाची सुटी झाली, त्यावेळी भाऊ जेवायला बसला आणि दुसरीकडे बहिणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता कुसुंबा ( ता.जळगाव) येथे घडली. संगीता प्रकाश मोहिते (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, संगीता यांचे १५ वर्षापूर्वी प्रकाश मोहिते यांच्याशी लग्न झाले होते. विशाल (वय १३) व विक्की (वय ९) अशी त्यांना अपत्ये आहेत. पतीला दारूचे व्यसन होते. आठ महिन्यांपूर्वी पती सोडून गेल्याने संगीता यांना मानसिक धक्का बसला. त्या माहेरी कुसुंब्यात भाऊ बळीराम पवार यांच्याकडे वास्तव्यास होत्या. भाऊ बांधकाम मजूर असल्याने त्याच्यासोबत मजुरी काम करायच्या. बुधवारी भाऊ व बहीण एकाच ठिकाणी काम करत होते. दुपारी एक वाजता जेवणासाठी काम थांबवले. भाऊ जेवण करीत असताना अचानक संगीता मोहिते निघून गेली. बळीराम यांनी आपले जेवण झाले तरी बहीण दिसत नाही म्हणून शोध घेत असतानाच संगीता हिने गावातील यशवंत राजपूत यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलीस अंमलदार सिद्धेश्वर डापकर व होमगार्ड चेतन लाड यांनीही घटनास्थळ गाठले. विहिरीत पाणी खोल असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहायक अधिकारी सुनील मोरे, प्रकाश चव्हाण, अश्वजित घरडे, देवीदास सुरवाडे, रवींद्र बोरसे, तेजस जोशी, नितीन बारी, भगवान जाधव यांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन विभागाच्या प्रयत्नांनंतर विहिरीतून खाटेच्या साहाय्याने तब्बल दोन तासांनंतर मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार, तरीही फरक नाही
संगीता या मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने त्याच्या उपचारासाठी त्यांचे वडील श्रावण पवार व भाऊ बळीराम यांनी अकोला, जळगावसह इतर ठिकाणी उपचार केले, मात्र काही सुधारणा झाली नाही. उपचारासाठी ९० हजार रुपये खर्च झाले होते, आजार आणि पतीची साथ नाही त्यामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती भाऊ बळीराम पवार यांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.