जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यांना इंजिन जोडतांना एक डबा रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या नंतर तातडीने भुसावळहून क्रेन मागवून डबा उचलण्यात आला व दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर शुक्रवारी दुपारी रिकाम्या मालगाडीला भुसावळकडे नेण्यासाठी इंजिन लावण्याचे काम सुरू होते. इंजिन लावतांना इंजिनच्या जोराच्या धक्याने इंजिनला जोडला जाणारा मालगाडीचा एक डबा रुळावरून खाली घसरला. ही घटना घडतात इंजिनच्या लोको पायलटने भुसावळ नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती दिली. या नंतर काही वेळातच भुसावळ हून एक हजार टन वजन उचलण्याची क्षमता असलेली क्रेन मशीन या ठिकाणी दाखल झाली. या क्रेन च्या मदतीने घसरलेला डबा रुळावर चढविण्यात आला. त्यानंतर पुन्हा मालगाडीला इंजिन जोडल्यानंतर ही मालगाडी भुसावळकडे रवाना झाली असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य लाईन वर या मालगाडीचा डबा घसरला असल्यामुळे मुंबईकडून येणाºया गाड्यांचा खोळंबा झाला होता.
इंजिन बदलवितांना मालगाडीचा डबा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 9:43 PM