लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, त्याच वेळी काही ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सोय करून देण्याकडे महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना धार्मिक स्थळे, तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंडरपास करून देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी कायमच केली होती, त्यासाठी परिसरातील नागरिकांनी काही महिने आधी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. सध्या रस्ता ओलांडायचा असेल, तर सालारनगर आणि मिल्लतनगरातील नागरिक जीव मुठीत घेऊन जात आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर आणि यंदा जानेवारी या रस्त्यावर काही दिवसांच्या अंतराने अपघात झाले होते. त्यानंतर, पुन्हा या ठिकाणी अंडरपासच्या मागणीने जोर धरला. या परिसरात दोन्ही बाजूंना मोठी वस्ती आहे, तसेच ओलांडण्यासाठी इच्छा देवी ते अजिंठा चौफुली या दरम्यान एकही जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली होती.
काय आहेत नागरिकांच्या मागण्या
अजिंठा चौफुली ते इच्छादेवी या दरम्यान सर्विस रोड करावा
मिल्लत हायस्कूलकडे जुन्यात अंडरपासमधून पाण्याचा निचरा होतो. तेथे एका मार्गातून रहदारीसाठी रस्ता करून द्यावा.
सालारनगर-मिल्लतनगर येथे अंडरपास करून रहदारीची स्वतंत्र सोय करून द्यावी.
पोलिसातही तक्रार
१२ जानेवारी, २०२१ रोजी जिल्हा मणियार बिरादरीचे फारुक शेख यांनी याबाबत येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी माहिती दिली होती. मात्र, पाचच दिवसांनी येथे अपघात झाला. त्यावेळी पोलिसांत सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेख केली होती.
आता काय आहे मागणी
शहरातील बहुतेक प्रमुख चौकांमध्ये महामार्ग प्राधिकरणाने अंडरपास केलेले नाहीत. त्यामुळे आता जर अजिंठा चौफुलीला जर उड्डाणपूल केला जात असेल, तर त्यासोबतच सालारनगरात येणाऱ्या उताराखालून रस्ता ओलांडण्यासाठी जागा करून द्यावी, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोट - या परिसरात अंडरपास असावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी आम्ही पाठपुरावाही करत आहोत. येथे अनेक वेळा अपघात होत असतात. याबाबत वेळोवेळी कायदेशीर मार्गाने संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे.
- फारुक शेख, जिल्हा मणियार बिरादरी