लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जात असतानाच पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील दोन मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असताना पाचोरा पालिकेकडून दंडात्मक कारवाई व पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लग्न सुरु असतानाच मंगल कार्यालयात पालिकेचे पथक धडकले अन् एकच धावपळ उडाली.
भडगाव रोड आशिर्वाद हॉल व स्वामी लॉन्स या दोन्ही मंगल कार्यालयात लग्न समारंभाचे कार्यक्रम होत असताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. यात दोन्ही कार्यालयात लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमून आली. यामुळे लग्न समारंभ ५० व्यक्तीमध्येच करण्यात यावे. या नियमाचे उल्लंघन होत प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे या कार्यालयांवर पाचोरा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी रुपये १० हजार दंडात्मक कारवाई केली असून पाचोरा पोलिसांकडून कार्यालयावर कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे तर १२जणांवर विना मास्कबाबत कारवाई केली.
यावेळी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे यांचेसह पोलीस कर्मचारी नगरपालिकेचे जाधव यांचे पथक मंगल कार्यालयात शुभारंभ सुरू असतानाच आल्याने वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली. अर्ध्या तासात कार्यालये खाली झाली.