जळगाव- हरेश्वर कॉलनीतील वृंदावन अपार्टमेंटमधील हरव्यासी कुटूंबीय गच्चीवर झोपलेले असताना तीन चोरट्यांनी त्यांच्या घरातून सुमारे १ लाख २६ हजार रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी मध्यरात्री ३़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घरमालकीन स्रेहा नितीन हरव्यासी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हरेश्वर कॉलनीतील वृंदावन अपार्टमेंटमध्ये स्रेहा नितीन हरव्यासी या पती, मुलांसह राहतात़ उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त त्यांच्याघरी बडोदा येथील बहिण नम्रता या त्यांच्या मुलांसह आलेल्या आहेत़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत जेवन झाल्यानंतर सर्वजण घराला कुलूप लावून झोपण्यासाठी गच्चीवर गेले़ मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास स्रेहा यांना कुलूप तोडण्याचा आवाज आला़ मात्र, त्यांनी त्या आवाजकडे दुर्लक्ष केले़ ३़३० वाजता पुन्हा कुलूप तोडण्याचा आवाज आला़ त्यांनी लागलीच इमारतीवरून खाली डोकावून पाहिले असता त्यांना तोंडाला रूमाल लावलेले तीन जण पळताना दिसून आले. त्यांनी खाली येवून पाहिले असता घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोने व चांदी चोरानी नेल्याचे लक्षात आले. तसेच सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले़ नंतर त्यांनी त्वरीत जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ माहिती मिळताच पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळ गाठत घराची पाहणी केली़ यावेळी पोलिसांनाही सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले़असा ऐवज लांबविलास्रेहा हरव्यासी यांनी चोरी झाल्यानंतर घरात पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटात ठेवलेले २० हजार रूपये किंमतीचे ८ ग्रॅम सोने, १५ हजार रूपये किंमतीचे ६ ग्रॅम कानातले सोन्याचे टॉप्स, १० हजार रूपये किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे कानातले टॉप्स, १० हजार रूपये किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, ७ हजार ५०० रूपये किंमतीचे २५ ग्रॅम चांदी, तीन हजार रूपयाचे २ ग्रॅमचे टॉप्स, २० हजार रूपये किंमतीचे ८ ग्रॅमची सोन्याची चैन, ७ हजार ५०० रूपये किंमतीची ३ ग्रॅमची अंगठी, ७ हजार ५०० रूपये किंमतीचे ३ ग्रॅमचे पेंडल, ५ हजार रूपयांचे २ ग्रॅम पेंडल, ७ हजार ५०० रूपयांचे ३ ग्रॅमचे पेंडल, ५ हजार रूपये किंमतीचे २ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, ५ हजार रूपयांचे २ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल आणि ३ हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या वाट्या आणि चमचा असा एकुण १ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे त्यांना दिसून आले़ अखेर मंगळवारी स्नेहा यांनी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़