जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे. प्रशासनही कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, अजूनही जिल्ह्यासह शहरातील बाजारांमधील गर्दी कमी झालेली नाही. शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सायंकाळच्या सुमारास सर्वाधिक गर्दी जळगाव शहरात होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना प्रशासन करणार, यावरही आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
सध्या कोविड रूग्णालयांमध्येही रूग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीये. दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे बेडची कमतरता भासू लागली आहे. जोमाने वाढत असलेल्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बाधितांचे मृत्यूचे प्रमाणही चोर पावलांनी वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आठवडा बाजारांना बंदी असताना, गल्लीबोळांचा आधार घेऊन बाजार भरवले जात आहेत. याकडेही लक्ष देण्याची मागणी आता ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. आधीच खराब रस्ते, अपुऱ्या सुविधा, धूळ आणि त्यात कोरोना यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.